
बेकायदा सरोगसी कांडात आज कल्याणच्या विठ्ठलवाडीतून एका मेडिकल चालकाला अटक करण्यात आली आहे. दलाल महिलांच्या सांगण्यावरून मेडिकल चालक सुमित सोनकांबळे हा खुलेआम गर्भधारणेची इंजेक्शन्स देत होता. त्यामुळे अंडाशय तस्करी प्रकरणातील आरोपींची संख्या पाचवर गेली असून सुमितप्रमाणेच डॉक्टरांच्या संमतीशिवाय औषधे देणारे अन्य मेडिकल चालकही लवकरच पोलिसांच्या रडारवर येणार आहेत. दरम्यान अटक केलेल्या महिलांच्या खात्यावर महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे तपासात समोर आल्याने मातृत्वाच्या बाजारात मोठ्या प्रमाणात पैशांचा सौदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
बदलापुरातील एका पीडित महिलेने उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर या भयंकर कांडाप्रकरणी शुक्रवारी रात्री जोवेली गावात छापा टाकून सुलक्षणा गाडेकर, उल्हासनगरातील साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे तसेच सोमवारी रात्री उल्हासनगरातील सोनोग्राफी सेंटरमधील एका महिला कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर मंगळवारी रात्री विठ्ठल वाडीतून सुमित सोनकांबळे याला उचलण्यात आले आहे.
मेडिकल चालकांचे धाबे दणाणले
बेकायदा सरोगसी कांडाप्रकरणी रोजच नवनवीन धक्कादायक माहिती आरोपींच्या तपासात पुढे येत आहेत. आरोपींच्या कॉल रेकॉर्डवरून पोलिसांनी सुमित सोनकांबळेला अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण विना प्रिस्क्रिप्शन इंजेक्शन दिल्याचे कबूल केले. त्याच्या प्रमाणेच या तस्करीत ठाणे परिसरातील असंख्य मेडिकल चालकांचा सहभाग आहे का, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे नियम धाब्यावर बसवणारे मेडिकल चालक हादरले आहेत.
ट्रांझेक्शनवरून संपूर्ण साखळीचा उलगडा होणार
अटक केलेल्या चारही महिलांच्या खात्यावर लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांच्या खात्यावरून काही पैसेदेखील पाठवण्यात आले आहेत. या सर्व नावांची यादीच विविध बँक खात्यांमधून पोलिसांनी जमा केल्याचे वृत्त असून या ट्रांझेक्शनवरून संपूर्ण साखळीचा छडा लागणार आहे.






























































