तारापूरच्या ‘विनायक केमेक्स’मध्ये वायुगळती, सुदैवाने जीवितहानी टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औद्योगिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या तारापूर एमआयडीसीमध्ये आज पुन्हा एकदा वायू गळती झाली. ‘विनायक केमेक्स’ या कंपनीमधून दुपारी दीडच्या सुमारास क्लोरीनची वायुगळती झाली असून उग्र वासामुळे कामगार अक्षरशः घुसमटले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आपत्कालीन यंत्रणेने धाव घेऊन दीड तासाच्या प्रयत्नानंतर परिस्थिती आटोक्यात आणली. दरम्यान क्लोरीनच्या गळतीमुळे एमआयडीसीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तारापूर एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक 82 येथे विनायक केमेक्स नावाची छोटी कंपनी असून त्यात पंधरा ते वीस कामगार काम करतात. तेथे सल्फ्युरिक क्लोराईड हे केमिकल तयार होते. आज दुपारच्या सुमारास नेहमीप्रमाणे उत्पादन सुरू असताना अचानक क्लोरीन वायुगळती सुरू झाली आणि कामगारांच्या घशाला त्रास सुरू झाला. तसेच अनेकांचे डोळेही चुरचुरले. काही कामगारांना रुग्णालयात दाखल करून तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले.

तारापूर एमआयडीसीत तीनशेहून अधिक कंपन्या असून अनेक कारखान्यांमध्ये नियमांची पायमल्ली केली जात आहे. दरम्यान आज विनायक केमेक्स कंपनीत वायुगळती झाल्याचे समजताच अग्निशमन दल व आपत्कालीन यंत्रणेने तातडीने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. दीड तासाच्या प्रयत्नानंतर गळतीचा स्त्रोत शोधण्यात यश आले. तांत्रिक दुरुस्ती केल्यानंतर ही गळती थांबली, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता. पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनीदेखील घटनास्थळी जाऊन कंपनीची पाहणी केली.

सखोल चौकशी करणार

विनायक केमेक्स या कंपनीत आज झालेल्या वायुगळतीची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. समीर शहा हे या कंपनीचे मालक असून त्यांना ही घटना घडल्यानंतर पाचारण करण्यात आले. दरम्यान कंपनीतील तांत्रिक व रासायनिक प्रकल्पांची तपासणी केल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.