
कराड ते खारघर प्रवास करणाऱ्या एका सोनाराचे तब्बल एक कोटी 14 लाख रुपयांचे सोने चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमधून प्रवास करत असताना ही चोरी झाल्याचे निष्पन्न झाले असून यानिमित्ताने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
भायखळा येथील श्री नाकोडा हाईट्स या इमारतीमध्ये राहणाऱ्या 64 वर्षीय सराफाने याबाबत खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 20 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सराफ सातारा जिल्ह्यातील कराड येथून दुर्गाम्बा ट्रॅव्हल्सच्या खासगी बसने शिमोगा ते मुंबईकडे प्रवास करत होते. प्रवासादरम्यान खारघर येथील बस थांब्याजवळ बस पोहोचल्यानंतर सराफाला आपली बॅग जवळ नसल्याचे लक्षात आले. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली मात्र बॅग सापडली नाही.




























































