धक्कादायक! शाळेच्या मैदानात खेळताना 9 वर्षीय विद्यार्थीनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलिकडच्या काळात लहान मुलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढताना दिसत असून, राजस्थानमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील गोटन गावातील कस्बे येथे एका खासगी शाळेत पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा खेळताना अचानक मृत्यू झाला. दिव्या राजेंद्र असे या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता शाळेत पोहोचली होती. शाळेच्या मैदानात सर्व विद्यार्थी खेळताना दिसत आहेत. सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसल्याप्रमाणे, खेळताना दिव्या अचानक बेशुद्ध झाली आणि मागच्या बाजूला कोसळली. शाळेतील कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार, हृदयविकाराचा झटका हे या मृत्यूचे संभाव्य कारण असू शकते. कुटुंबीयांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्यानंतर प्रशासनाने मृतदेह त्यांच्या स्वाधीन केला.

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या चार महिन्यांपूर्वीच दिव्याचा मोठा भाऊ अभिषेक याचाही अशाच प्रकारे अचानक मृत्यू झाला होता. अवघ्या 16 वर्षांच्या मुलापाठोपाठ आता पाचवीत असलेल्या मुलीचाही अकाली मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन निष्पाप मुलांच्या अशा जाण्याने केवळ कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.