Ratnagiri News – कोकणात काजू बोंडे प्रक्रिया उद्योगाअभावी वाया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यात काजू उद्योग कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलढाल करीत आहे. मात्र काजूवर प्रक्रिया होत असली तरी बोंडे प्रक्रियेअभावी वाया जात आहे. दरवर्षी प्रक्रिया उद्योगाच्या थापा मारल्या जातात. पण प्रक्रिया उद्योगासाठी पुढाकार घेणाऱ्यांना मात्र सहकार्य मिळत नाही. या हंगामात काजू बी ला 150 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे, काजू प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काजू बी ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने काजू बी खरेदी करून ती सेंद्रिय असल्याने दलाल त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवतात.

रत्नागिरी जिल्ह्यात काजूच्या ओल्या बी ला 100 ते 250 रुपये किलो भावाने विकले जात आहेत. यंदा काजू बी ला सुरुवातीला चांगला भाव मिळाला आहे. काजू बी प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत पण काजू बोंडू मात्र गोवा राज्यात नेऊन त्यावर प्रक्रिया केली जात आहे. काजू बोंडूपासून उच्च प्रतीचे मद्यार्क , औषधी द्रव्य बनविले जाते. आज काजू गर आणि काजू मद्यार्काला मोठी मागणी आहे. गोवा राज्याने काजू बोंडूपासून प्रक्रिया करून मद्यार्क निर्माण केल्याने बोंडू मोठ्या प्रमाणात गोवा राज्यात नेण्यात येतो. मात्र रत्नागिरी जिल्हा आजही प्रतिक्षेत आहे.