
लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न तिघांनी केला. त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी आपल्या तत्परतेने उधळून लावला आहे. गुन्हा दाखल होताच अवघ्या एका तासांत साफळा रचून पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाचा जीव भांड्यात पडला असून पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (25 फेब्रुवारी 2026) अल्पवयीन मुलील फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा देवणी पोलीस ठाण्यात दाखल झाला. गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखळी अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या सुचनांनुसार आरोपींचा शोध घेण्यात तपास सुरू करण्यात आला. तपास सुरू असताना आरोपी छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ बीड, छ.संभाजीनगर आणि महामार्ग पोलीस यंत्रणांशी संपर्क साधण्यात आला. बीड ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पाचोड येथील टोलनाक्यावर नाकाबंदी लावण्याबाबत पोलीस ठाणे पाचोड येथील अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. तसेच आरोपींचे वर्णन व वाहनाची माहिती संबंधित पोलीस ठाण्यांना देण्यात आली.
दरम्यान, महामार्ग सुरक्षा पथक, बीड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मुंढे यांनी संपर्क साधून गुन्ह्यातील तिन्ही आरोपी व पिडीत मुलगी गेवराई येथे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर देवणी पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोउपनि व-हाडे, स.फौ. सय्यद व महिला पोलीस अंमलदार गोपे यांना तात्काळ पोलीस ठाणे गेवराई येथे पाठविण्यात आले. त्यांनी संबंधित आरोपी, त्यांचे ताब्यातील वाहन व पिडीत अल्पवयीन मुलगी यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी देवणी येथे आणले. कलीम हाकानी शेख (20), अशपाक करीम शेख (20) आणि बिलाल खालेद कुरेशी (25) अशी आरोपींची नावं असून त्यांच्यावर ४४/२०२६ अन्वये कलम १३७(२), ३(५) बी.एन.एस.एस. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक लातूर अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे देवणीचे सपोनि बी. एस. गायकवाड, पोउपनि व-हाडे, सफौ सय्यद, मपोह/७९२ गोपे यांनी तत्परतेने व समन्वयाने पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि व-हाडे हे करीत आहेत.






























































