
टीम इंडियाला पराभवाची धुळ चारल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा सुपडा साफ केला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध मोठा विजय साजरा करणाऱ्या वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकेने एकतर्फी पराभव करत सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि सेमी फायनलमध्ये एन्ट्री मारली.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळळ्या गेलेल्या या सामन्यात प्रथम दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या आक्रमक फलंदाजांच्या पायात बेड्या ठोकल्या. 83 धावांवर वेस्ट इंडिजच्या 7 विकेट पडल्या होत्या. मात्र, त्यानंतर जेसल होल्डर (31 चेंडू 49 धावा) आणि रोमारिओ शेफर्ड (37 चेंडू नाबाद 52 धावा) यांनी धुवांधार फटकेबाजी केल्यामुळे संघाला 8 गड्यांच्या मोबदल्यात 176 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आलं. लुंगी एनगीडीने सर्वाधिक 3 विकेट घेतेल्या तर रबाडा आणि कॉर्बिन बॉश यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांना संघाला अपेक्षित अशी आक्रमक सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी कर्णधार मार्कर्रम आणि डी कॉक यांनी 95 धावांची भागीदारी केली. डी कॉक 47 धावांची सलामी देत बाद झाला. त्यानंतर आलेल्या रायन रिकेलटन यांनेही विस्फोटक अंदाजात 28 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर नाबाद 45 धावा चोपून काढल्या तर, मार्करमने 46 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 82 धावांची विजयी खेळी केली.




























































