
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी आरोग्याच्या कारणांचा हवाला देत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यास आता सात महिने पूर्ण होत आले असून आहे. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. याबाबत आता धनखड यांनीच स्पष्ट विधान केले आहे. उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा देताना आपण कधीही आजारी असल्याचा दावा केला नव्हता. केवळ आरोग्याला प्राधान्य देत असल्याचे म्हटले होते, जे प्रत्येक व्यक्तीने करायला हवे, असे धनखड म्हणाले.
राजस्थानच्या चुरू येथे एका छोट्या सभेला संबोधित करताना धनखड म्हणाले, म्हणतात ना, पहिलं सुख हे निरोगी शरीर असतं. मी आरोग्याबाबत कधीही हलगर्जीपणा केला नाही. जेव्हा मी उपराष्ट्रपती पद त्यागण्याची घोषणा केली, तेव्हा मी आजारी असल्याचे कुठेही म्हटले नव्हते. मी फक्त आरोग्याला महत्त्व देत असल्याचे सांगितले होते. आपल्या शास्त्रांमध्येही आरोग्याला महत्त्व देण्यास सांगितले आहे. मी अनेकदा अशा गोष्टी बोललो आहे ज्याचा लोकांना राग आला, पण मी माझे म्हणणे स्पष्टपणे मांडले, असेही ते म्हणाले.
चुरूमध्ये धनखड यांचे आदरातिथ्य माजी काँग्रेस खासदार राम सिंह कासवान आणि ऑलिंपियन तसेच माजी काँग्रेस आमदार कृष्णा पुनिया यांनी केले. राम सिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण चुरू येथे आलो असल्याचे धनखड यांनी सांगितले.
मैंने उपराष्ट्रपति का पद स्वास्थ्य कारणो से नही त्यागा था – जगदीप धनखड़
अब तो सच बोल दो— Surendra Rajput (@ssrajputINC) February 26, 2026
उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा
21 जुलै 2025 रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. विरोधी पक्षांनी या राजीनाम्यामागे काही वेगळे कारण असावे, असा दावा करत मोदी सरकारसमोर प्रश्न उपस्थित केले होते.
निवासाचा प्रश्न अजूनही कायम
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जुलै महिन्यातच राजीनामा दिला होता. मात्र, राजीनामा देऊन सात महिने उलटले तरी त्यांना अद्याप शासकीय निवासस्थान मिळालेले नाही. धनखड यांना मोदी सरकारकडून ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याचे चित्र आहे. सप्टेंबर महिन्यात धनखड यांनी उपराष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान रिकामे केले. सध्या ते दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर भागातील ‘गदईपूर’ येथील एका खाजगी फार्महाऊसमध्ये राहत आहेत. विशेष म्हणजे, हे फार्महाऊस ‘आयएनएलडी’चे नेते अभय चौटाला यांचे आहे. देशाच्या माजी उपराष्ट्रपतींना एका दुसऱ्या नेत्याच्या फार्महाऊसवर आश्रय घ्यावा लागत असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.


























































