अजितदादांचा अपघात की घातपात? रोहित पवार मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला खरेच अपघात झाला, की हा घातपात होता, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विमान अपघाताबाबत शंका निर्माण होत असताना ज्या व्हीआरएस कंपनीचे विमान होते त्या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. दोघांमध्ये जवळपास दहा मिनिटे चर्चा झाली.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अजितदादांच्या अपघाती मृत्यूबाबत शंका आहेत, त्या शंका घेऊनच मी आज मुख्यमंत्र्यांपुढे बाजू मांडल्याचे रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत सगळे रिसर्च पेपर आणि कागदपत्रे माझ्याकडे आली आहेत, ती मी मुख्यमंत्र्यांना दिली आहेत. मुख्यमंत्र्यांनी देशाचे गृहमंत्री असतील किंवा वरिष्ठ नेते त्यांच्याकडे बाजू मांडावी, अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस अधिकाऱयांशी चर्चा करून तांत्रिक अडचणी काय आहेत हे समजून घेतो, असे सांगितल्याचे रोहित पवार म्हणाले.

थातूरमातूर नको, डिटेल्स अहवाल हवा 

विमान अपघाताबाबत केंद्र सरकारकडून उद्यापर्यंत अहवाल येईल अशी अपेक्षा आहे. थातूरमातूर अहवाल नको, आम्हाला डिटेल्स अहवाल हवा आहे. चौकशी पूर्णपणे पारदर्शक व्हावी, कोणतीही बाब दडपली जाऊ नये यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे रोहित पवार यांनी सांगितली.

अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला?

अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी सरकार ‘एफआयआर’ दाखल करून घेण्यास घाबरत आहे. त्यामुळे त्यामागे काहीतरी काळेबेरे आहे असा संशय निर्माण होतोय. अजित पवारांचा अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आमदार रोहित पवार यांच्या भेटीनंतर एक्स पोस्ट करत केला आहे.

अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर त्या घटनेबद्दल अनेक शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. याबाबत आमदार रोहित पवार हे पोलीस स्थानकात तक्रार नोंदवून घ्यायला गेलेले असताना, त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला गेला. पोलिसांवर ‘एफआयआर’ नोंदवून न घेण्यासाठी सरकारकडूनच दबाव आणला गेला असं दिसतंय. एफआयआर नोंदवून न घेण्यासाठी सरकार दबाव का टाकतंय? एफआयआर नोंदवून घेतलाच पाहिजे, असे सक्त निर्देश असताना जर एका आमदाराची तक्रार नोंदवून घेतली जात नसेल तर मग सामान्य माणसांचं काय होत असेल?, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.