
>> वर्णिका काकडे
अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा आणि यवतमाळ अशा पाच जिह्यांमध्ये बोलली जाणारी वऱहाडी बोली ही मराठीतील एक महत्त्वाची बोली. महाराष्ट्रातील प्राचीन बोली भाषांमध्ये वऱहाडी बोलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘वऱ्हाड’ या भाषिक क्षेत्रांत बोलली जाते, म्हणून तिला ‘वऱ्हाडी’ हे ‘प्रदेशवाचक’ नाव मिळालं आहे.
या बोलीची पाळेमुळे 12व्या शतकातल्या, चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथाच्या उदयापर्यंत जातात. वऱ्हाडीतील पहिला ग्रंथ म्हणून ‘लीळाचरित्र’ या ग्रंथाची नोंद करता येईल. नंतरच्या काळात वऱ्हाडी बोलीतील अभिव्यक्तीशैलीने अनेक साहित्यिकांना प्रेरणा दिली. त्यांनी वऱहाडी जनजीवनातील दुःख, आनंद, संघर्ष, शृंगार आणि विनोदाचे प्रभावी चित्रण आपल्या लेखनातून केले. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा यांनी देखील वऱहाडी बोलीचा उपयोग समाजप्रबोधनासाठी करत भजने आणि कीर्तने सादर केलीत. यामुळे वऱहाडी बोली समाजप्रबोधनासाठी प्रभावी माध्यम ठरली. अलीकडच्या काळातही अनेक कवींनी त्यांच्या कवितांत अंशत किंवा संपूर्ण वऱहाडीचा वापर केला आहे. उद्धव शेळके, मनोहर तल्हार, मधुकर केचे, गो.नी. दांडेकर, बाजीराव पाटील, नरेंद्र इंगळे, सदानंद देशमुख, रमेश इंगळे उत्रादकर, पुरुषोत्तम बोरकर तसेच इतर अनेक असे लेखक, कवी आहेत की ज्यांनी या बोलीचे सौंदर्य व ताकद वाढवण्यास हातभार लावला आहे. विदर्भाच्या वेगवेगळ्या भागात आणि जातींनुसार वऱहाडीची रूपे वेगवेगळी आहेत. वऱहाडी बोली प्रमाण मराठीतील ला (ला) आणि ना (ना) या अक्षरांच्या शेवटच्या अक्षरांना ले (ले) ने बदलते, हे वैशिष्टय़ शेजारच्या खान्देशी भाषेतही आहे. म्हणून, प्रमाण मराठीतील मला (मला) (माझ्यासाठी) पुरूष (मले) होतो तर त्यान्ना (त्यांना) (त्यांच्यासाठी) वऱ्हाडीमध्ये त्याले (त्याले) होतो.
वऱहाडी बोलीभाषा ही विदर्भाच्या संस्कृतीचे प्रतीक मानली जाते. ती येथील चालीरीती, परंपरा आणि लोकजीवनाचे प्रतिबिंब आहे. वऱ्हाडी भाषेतील वाक्प्रचार, म्हणी आणि लोकगीतांमधून विदर्भाच्या पारंपरिक जीवनशैलीचे दर्शन घडते. या बोलीतील गोडवा, साधेपणा आणि संवाद साधण्याची सहजता नाते जोडते. वऱ्हाडी लोककथांचे सादरीकरण तसेच कवितांमधून प्रकट होणारी भावना वऱ्हाडी बोलीला सांस्कृतिकदृष्टय़ा समृद्ध बनवते. वऱ्हाडीतील साहित्यिक परंपरेने मराठी भाषेस महत्त्वपूर्ण योगदान दिले असून सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी ती आजही महत्त्वाची आहे.


























































