मुंबईत विदेशी तरुणीशी गैरवर्तन, फोटोसाठी पाठलाग करणाऱ्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईमध्ये एका विदेशी तरुणीसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. इनेस फारिया असे या विदेशी तरुणीचे नाव असून या महिलेने सोशल मीडियावर घडलेला प्रकार शेअर केला आहे. यामध्ये असे दिसते की, दोन तरुणांनी फोटो काढण्याच्या बहाण्याने तिचा तब्बल 15 मिनिटे पाठलाग केला. तिने वारंवार नकार देऊनही हे तरुण ऐकत नसल्याने अखेर तरुणीला त्यांना ढकलून दूर करावे लागले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ महिलेने इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

इनेस फारियाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ती गेल्या दोन महिन्यांपासून हिंदुस्थानात प्रवास करत असून आतापर्यंतचा तिचा अनुभव अत्यंत सुखद आणि स्वागतार्ह होता. मात्र, मुंबईतील या घटनेने तिला असुरक्षिततेची जाणीव करून दिली. तिने कॅप्शनमध्ये स्पष्टपणे लिहिले की, ” No (नाही) हे एक पूर्ण वाक्य आहे. येथे कोणाचीही सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची असते.” वारंवार ‘नाही’ म्हणूनही तरुणांनी केलेली जबरदस्ती ही अत्यंत अस्वस्थ करणारी होती, असेही तिने पोस्टमध्ये नमूद केले.

व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून मुंबई पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी इनेस फारिया या विदेशी तरुणीशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराबाबत अधिक माहिती मिळवली. यानंतर मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात दोन अनोळखी तरुणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 78 (1) आणि 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस व्हिडिओच्या आधारे या आरोपींचा शोध घेत असून लवकरच त्यांना अटक करण्याची शक्यता आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी इनेस फारियाच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तिची माफी मागितली आहे. “काही लोकांमुळे संपूर्ण देशाची प्रतिमा खराब होत आहे,” अशा भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी तिला मदतीचे आश्वासन दिले असून मुंबई पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. या घटनेमुळे महिला पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.