
राज्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान तरुण उमेदवारांची होणारी प्रचंड गैरसोय आणि दुरवस्थेचा मुद्दा आज विधानसभेत चांगलाच गाजला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी या विषयावर आक्रमक भाषण करत सरकारचे लक्ष वेधले.
आदित्य ठाकरे यांनी सभागृहात बोलताना म्हटले की, “वसई विरार, मीरा भाईंदरजवळ पोलीस आयुक्तालय येथे जी परीक्षा द्यायला मुले आलेली आहेत, ती रस्त्यावर झोपतात. कुठे ब्रिजखाली, फुटपाथवर झोपतात. ही चांगली सुशिक्षित, होतकरू मुले आहेत. एक स्वप्न घेऊन येतात की पोलीसभरती होईल. माझी सरकारकडे विनंती आहे की, कमीत कमी त्यांची रात्री झोपण्याची व दिवसा खाण्याची सोय केली, संपूर्ण महाराष्ट्रात जिथे भरती प्रकारीया होते तर, राज्याची लाज राखली जाईल. या तरुण मुलामुलींची गैरसोय होणार नाही.”


























































