आता सहकारच्या निवडणुकांची रणधुमाळी, अहिल्यानगर जिल्हा बँकेला मतदारयादी करण्याच्या सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा बँकेला मतदारयादी करण्याचे निर्देश सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. त्यानुसार आता बँक प्रशासनाकडून मतदारयादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायटय़ांना मतदानासाठी ठराव करावा लागणार असून, त्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान, जिह्यातील काही सहकारी संस्थांच्या निवडणुका गेल्या वर्षभरापासून रखडल्या होत्या, तर काहींची प्रक्रिया सुरू होऊन ती मध्येच थांबवण्यात आली होती. आता या सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश सहकार खात्याकडून देण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीला राज्य शासनाने स्थगिती दिली होती. मात्र, नुकतीच ही स्थगिती उठविण्यात आल्याने आता जिह्यात जिल्हा बँकेसह मुळा, लोकनेते मारुतराव घुले, वृद्धश्वेर या तीन सहकारी साखर कारखाना व 153 सेवा सोसाटय़ांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या विद्यमान संचालकांची मुदत 20 फेब्रुवारीलाच संपुष्टात आली आहे. ही मुदत संपण्यापूर्वी तीन महिने अगोदर बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होते. मात्र, राज्य शासनाने यापूर्वी 31 डिसेंबरपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका न घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. आता या निवडणुका होणार असून, त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागा असून, त्यात 14 जागा सेवा सोसायटय़ांसाठी आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

मुळा, ज्ञानेश्वर, वृद्धश्वेरची प्रक्रिया पुढील आठवडय़ात

n अहिल्यानगर जिह्यात तीन सहकारी साखर कारखान्यांची मुदत संपली असून, त्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील आठवडय़ापासून मतदारयादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मुळा सहकारी साखर कारखाना, लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना, वृद्धश्वेर सहकारी साखर कारखाना याची निवडणूक प्रक्रिया सुरू होत आहे. मुळाची मुदत 18 जानेवारी, ज्ञानेश्वरची मुदत 20 जानेवारी, तर वृद्धश्वेरची मुदत 28 जानेवारी रोजी संपुष्टात आली आहे.

पर्यटनाला झळाळी अन् पायाभूत सुविधांवर भर

महाबळेश्वर नगरपरिषदेचा 169.73 कोटींचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर

महाबळेश्वर, दि. 1 (सा. वा.) – जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱया महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा शिलकी अर्थसंकल्प विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्टय़ म्हणजे सर्वसामान्यांवर कोणताही नवीन कराचा बोजा न टाकता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. ‘पर्यटन वृद्धी, शहर सुशोभीकरण आणि पर्यावरण संवर्धन’ या त्रिसूत्रीवर आधारित हा अर्थसंकल्प शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नगरपरिषदेने मांडलेल्या या अंदाजपत्रकात एकूण 169.73 कोटी रुपये जमा अपेक्षित धरली आहे. त्या तुलनेत 169.64 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. अत्यंत सूक्ष्म नियोजनानंतर हा अर्थसंकल्प 9 लाख 6 हजार रुपयांच्या शिलकीचा दाखवण्यात आला असून, महसुली तूट भरून काढण्याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे.

शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीचे सभापती रोहित ढेबे यांनी उत्पन्नवाढीबाबतचा महत्त्वाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. या प्रस्तावास स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती संजय बाळकृष्ण जंगम यांनी अनुमोदन दिले, तर विरोधी पक्षनेते कुमार शिंदे यांनी नगरपरिषदेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून एकत्रित प्रयत्न करावेत, अशी सूचना मांडली.

पाणीपुरवठा आणि अमृत योजना

वाढती लोकसंख्या आणि वर्षभर येणाऱया लाखो पर्यटकांची गरज लक्षात घेता, शहराला अखंडित आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्यांचे नूतनीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी आणि त्यामुळे निर्माण होणारी तूट भरून काढण्याबाबत सभेत सखोल चर्चा करण्यात आली.

उत्पन्नवाढीसाठी ‘ऍक्शन प्लॅन’

n शहरातील सर्व नवीन मिळकतींना तातडीने कर आकारणी n मिळकत कर, पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम n प्रशासकीय खर्चात काटकसर करून महसुली तूट कमी करणे

प्रेक्षणीय स्थळांचा कायापालट

n महाबळेश्वर हे पर्यटकांचे आवडते केंद्र असल्याने येथील प्रमुख प्रेक्षणीय स्थळांचा कायापालट करण्यासाठी विशेष निधीची तरतूद आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी शहरात विविध ठिकाणी अत्याधुनिक प्रसाधनगृहे उभारली जाणार आहेत. तसेच प्रेक्षणीय स्थळांचे सुशोभीकरण करून पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यावर भर दिला जाणार आहे.

n शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाचे मोठे प्रकल्प हाती
घेतले जातील. पावसाळ्यात होणारी गैरसोय टाळण्यासाठी पावसाळी गटारांची दुरुस्ती आणि रुंदीकरण करण्यासाठी भांडवली खर्चातून मोठी तरतूद करण्यात आली आहे.

‘प्लॅस्टिकमुक्त महाबळेश्वर’ मोहीम

n महाबळेश्वरच्या नैसर्गिक सौंदर्याचे रक्षण करण्यासाठी ‘प्लॅस्टिकमुक्त महाबळेश्वर’ मोहिमेला अधिक बळ दिले जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाईल. ‘माझी वसुंधरा’ योजनेअंतर्गत शहरातील जुन्या वृक्षांचे जतन आणि मोठय़ा प्रमाणावर नवीन वृक्षारोपण करण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे.

महाबळेश्वर नगरपरिषदेचे उत्पन्न वाढवण्यासोबतच खर्चात काटकसर करून आर्थिक शिस्त लावणे हेच प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विकासकामे करताना गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही.

— योगेश पाटील, मुख्याधिकारी

हा अर्थसंकल्प सामान्यांचा आहे. आम्ही कोणताही नवीन कर लादलेला नाही. महाबळेश्वरला जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पर्यटनस्थळ बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत. या अंदाजपत्रकातून शहराच्या पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलेल.

— सुनील शिंदे, नगराध्यक्ष