
नववे शीख गुरू श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्ताने खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंद-दी-चादर’ या सोहळ्याची आज सांगता झाली. शनिवारपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात लाखो भाविक सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्याला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.
दिल्लीतील चांदणी चौक येथे धर्मस्वातंत्र्यासाठी 1675 मध्ये प्राणार्पण करणाऱ्या गुरू तेग बहादूरजी यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ खारघर येथील ओवे मैदानावर शहिदी समागम सोहळा पार पडला. गुरू तेग बहादूरजी यांचे स्मृतिस्थळ म्हणून उभारलेले गुरुद्वारा शीश गंज साहिब हे शीख समाजाचे प्रमुख तीर्थस्थान मानले जाते. त्या ऐतिहासिक घटनेच्या 350 व्या वर्षानिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते.
गुरू तेग बहादूर यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी दिलेल्या बलिदानाचे आज या शहिदी समागमच्या माध्यमातून आपण स्मरण करतो आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेली ही परंपरा फक्त स्मृती नाही, तर भविष्याचा मार्ग बनली आहे. सर्वांनी इतिहास फक्त लक्षात ठेवायचा नाही, तर जीवनाच्या आचरणात उतरवणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
कितीही मोठे संकट आले तरी धर्माचे रक्षण कसे करायचे ही परंपरा शीख धर्माने जगाला दाखवली आहे. गुरू तेग बहादूरजी औरंगजेबाच्या अत्याचारापुढे झुकले नाहीत. आज काही ठिकाणी रोगातून बरे होण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी धर्म बदलला जात आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे, असे यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबईत रुग्णालय उभारणार
नवी मुंबईत गुरू तेग बहादूरजी यांच्या नावाने एक भव्य रुग्णालय उभे करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.




























































