
मुंबई महापालिका रुग्णालयांत कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असून त्याचा ताण इतर कर्मचारी वर्गावर पडत आहे. या रुग्णालयांत हजारो कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे नवीन कंत्राटी भरतीऐवजी पालिकेने 57 हजार 907 रिक्त शेडय़ुल्ड पदे भरावीत, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली.
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर, शिष्टमंडळातील दामोदर पांडकर व इतर पदाधिकाऱयांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. पालिकेत कंत्राटी भरती न करता कायम कामगार भरती करावी, अशी भूमिका यावेळी कामगार सेनेतर्फे घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनातील रिक्त 70 हजार पदे भरण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिकेनेही 57 हजार 907 रिक्त शेडय़ुल्ड पदे भरावीत, अशी मागणी कामगार सेनेने केली. त्यावेळी प्रशासन आवश्यकतेनुसार रिक्त पदे भरीत असून कार्यकारी सहाय्यक, जे ई. ई. पदे भरली असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. तथापि, अत्यावश्यक खात्यासहीत इतर खात्यातील चतुर्थ श्रेणीची पदे अनेक वर्षे भरली गेली नसल्यामुळे सेवानिवृत्ती, मृत्यू व इतर कारणांमुळे 57 हजार 907 पदे रिक्त राहिल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणण्यात आली. लोकमान्य टिळक, शीव रुग्णालयाची जाहिरात दाखवून कायम कामगारांच्या जागी कंत्राटी भरती होत असल्याने या भरतीस म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने विरोध केला. यात लक्ष घालण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.



























































