
होळी खेळताना त्वचा आणि केस सुरक्षित राहावेत यासाठी घरी तयार केलेले नैसर्गिक रंग सर्वोत्तम पर्याय ठरतात. हे रंग स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असतात. त्यामुळे कोणतेही रासायनिक कलर वापरण्यापेक्षा घरच्या घरी देखील आपण नैसर्गिक रंग बनवू शकतो.
पिवळा रंग बनवलण्यासाठी आपण घरातील काही वस्तूंचा वापर करुन हा रंग आपण तात्काळ बनवू शकतो. याकरता हळद, बेसन / कॉर्नफ्लोअर व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे. त्यांनतर हा रंग गुलाबजल किंवा मुलतानी माती मध्ये कालवावा.
लाल किंवा गुलाबी रंग तयार करण्यासाठी, सुकी गुलाबाची फुले किंवा जास्वंद (हिबिस्कस) वाळवून बारीक पूड करावी. हा रंग गुलाबपाण्यात कालवून त्वचेला लावल्यास कोणतीही हानी पोहोचत नाही. बीट किसून पाण्यात उकळा. पाणी थंड झाल्यावर सुंदर गुलाबी रंग तयार होतो.
हिरवा रंग तयार करण्यासाठी पालक, कोथिंबीर, पुदिना यांचा वापर करावा. मिक्सरमध्ये ही तिन्ही प्रकारची पाने एकत्र करुन, हा रंग हिरवा रंग म्हणून आपण चेहऱ्याला लावू शकतो.
केशरी रंग तयार करण्यासाठी झेंडूच्या फुलांचा वापर करावा. झेंडूची फुले वाळवून पूड करा किंवा पाण्यात भिजवून ठेवावीत. त्यानंतर केशरी रंग तयार होण्यास अवघा तासभर लागतो.
नैसर्गिक रंग वापरताना कोणत्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात
रंग तयार केल्यानंतर स्वच्छ डब्यात साठवा.
कोणताही रंग वापरण्यापूर्वी त्वचेवर थोडा रंग लावून चाचणी करा.
डोळे आणि तोंडात रंग जाणार नाही याची काळजी घ्या.
सणानंतर साध्या पाण्याने आणि सौम्य साबणाने अंघोळ करा.






























































