
होळी म्हटली की घराघरात गोड सुवास दरवळतो—तो म्हणजे पुरणपोळीचा! पण पुरणपोळी खऱ्या अर्थाने मऊ, लुसलुशीत आणि पातळ व्हावी यासाठी काही बारकावे पाळणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक गृहिणीला पुरणपोळी जमतेच असे नाही. परंतु असे असले तरीही पुरणपोळी करणे हे फार कठीण नाही. काही महत्त्वाच्या ठराविक टिप्स लक्षात ठेवल्या तर पुरणपोळी सुद्धा उत्तम जमते.
पुरणपोळी करताना प्रामुख्याने पुरण करण्यासाठी वापरत असलेली डाळ योग्य प्रकारे शिजवणे खूप गरजेचे आहे. याकरता साधारणपणे चणाडाळीचा वापर केला जातो.
डाळ 1–2 तास भिजवून घ्या म्हणजे ती लवकर आणि समान शिजते. डाळ कुकरमध्ये जास्त शिजू देऊ नका; ती मऊ पण पाणीदार नसावी. डाळ शिजल्यानंतर पूर्ण पाणी गाळून घ्या. पाणी राहिल्यास पुरण सैल होते. गाळलेले डाळीचे पाणी (कट) वापरून कटाची आमटी बनवता येते.
पुरण तयार करताना काय लक्षात ठेवायला हवे
शिजलेल्या डाळीत गूळ घाला आणि मंद आचेवर ढवळत रहा.
गूळ पूर्ण वितळून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
वेलची पूड, जायफळ पूड घातल्यास सुगंध आणि चव वाढते.
तयार पुरण पूर्ण थंड झाल्यावरच पोळीमध्ये भरा.
पुरण खूप सैल असेल तर पोळी लाटताना बाहेर येते.
पुरणपोळीसाठी कणिक मळताना या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात
गव्हाचे पीठ किंवा मैदा (किंवा दोन्ही मिसळून) वापरू शकता.
पीठ खूप घट्ट नसावे; थोडे सैल आणि मऊ मळा.
थोडे तेल किंवा तूप घालून मळल्यास पोळी मऊ होते.
कणिक किमान 30–45 मिनिटे झाकून ठेवावी.
पुरणपोळी लाटताना आणि भाजताना काय लक्षात ठेवायला हवे
कणकेचा गोळा थोडा मोठा आणि पुरणाचा गोळा त्याहून मोठा ठेवा. हलक्या हाताने आणि समसमान दाब देत पुरणपोळी लाटावी. तवा मध्यम आचेवर गरम असावा; खूप जास्त आच टाळा.
दोन्ही बाजूंनी तूप लावून भाजल्यास चव आणि मऊपणा वाढतो.
पुरणपोळी मऊ होण्यासाठी कोणत्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात.
पुरण थंड असावे.
पीठ सैल आणि चांगले मळलेले असावे.
पोळी भाजून झाल्यावर लगेच झाकून ठेवा म्हणजे ती कोरडी पडत नाही.
गरम पोळीवर तूप घातल्यास ती अधिक लुसलुशीत होते.






























































