
चंद्रपूरच्या महिलांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. वीस मिनिटात वीस लावण्या सादर करीत 2432 महिलांनी गिनिज बुकमध्ये नोंद केली. आधीचा विक्रम हा 1326 महिलांचा होता. त्याला मागे टाकत हा नवा विश्वविक्रम प्रस्थापित झाला. सोमय्या पॉलिटेकनीक व उत्कृष्ट महिला मंच या संघटनेच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षभरापासून या संघटनेने महिलांना या उपक्रमासाठी तयार केले.
चंद्रपूर शहरात अनेक ठिकाणी प्रशिक्षणाची व्यवस्था केली. हैदराबाद इथूनही प्रशिक्षक बोलावण्यात आला होता. वीस मिनिटात वीस लावण्या सादर करण्याचे आणि त्याही पूर्ण वेशात, आव्हान होते. हे आव्हान या महिलांनी लीलया पेलले.
चांदा क्लब मैदानात झालेल्या या उपक्रमाची नोंद घेण्यासाठी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या सोनिया उशिरागोची या उपस्थित होत्या. त्यांनीच या विश्वविक्रमाची घोषणा केली. एका वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाने चक्क विश्वविक्रमाला गवसणी घालण्याची किमया चंद्रपूरच्या महिलांनी केली. त्यामुळे या आयोजनाचे सार्थक झाले, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.






























































