
खामेनी यांच्या मृत्यूवर हिंदुस्थानच्या राष्ट्रपतींनी आणि पंतप्रधानांनी शोक व्यक्त करायला हवा असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच मोदींच्या गळ्यात लटकलेल्या पदकामुळे देशातील महागाई कमी होणार नाही असा घणाघातही केला.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, खामेनी यांची हत्या ही सैतानी कृत्य आहे. एका मुलींच्या शाळेवर हल्ला केला जातो, शंभरहून अधिक कोवळ्या मुली तिथे ठार केल्या जातात, याचा निषेध जगाने केला पाहिजे. याचा निषेध मोदींनी आणि हिंदुस्थानच्या राष्ट्रपतींनी केला पाहिजे. सरकार मुकबधीर होऊन का बसलेले आहेत? शाळेवर हल्ला होतो आणि इस्रायल कडून 100 पेक्षा जास्त कोवळ्या मुलींची हत्या केली जाते, अशा सैतानी वृत्तीच्या राज्यकर्त्याला मोदी जाऊन मिठी मारतात आणि त्यांचे पदक गळ्यात घालून हिंदुस्थानात येतात आणि गप्प बसतात. याच्या मागे काहीतरी रहस्य आहे.
जर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवू शकतात, तर मोदी इतके मोठे नेता आणि स्वतःला विश्वगुरू म्हणवत असतील तर त्यांनी इराण–इस्रायल युद्ध थांबवायला हवे. मोदीजी इतके मोठे नेता आहेत, जागतिक नेता आहेत, इतिहासात असा नेता झाला नाही आणि होणार नाही असे जर म्हटले जाते, तर त्यांनी पुढे येऊन आपल्या मित्रांना सांगायला हवे की आता पुरे झाले, युद्ध थांबवा. इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनी हे असे व्यक्तिमत्त्व होते ज्यांना इस्रायल वगळता संपूर्ण जग मानत होते. ते भारताचे खरे आणि परंपरागत मित्र होते. भारताच्या संकटाच्या काळात त्यांनी नेहमी समर्थन दिले. खामेनी साहेब जवाहरलाल नेहरू यांचे मोठे प्रशंसक होते, त्याचा राग मोदींना आहे का?
अशा नेत्याची हत्या झाली आहे तर हिंदुस्थानच्या राष्ट्रपतींनी आणि पंतप्रधानांनी शोक व्यक्त करायला हवा. तुम्ही कोणाला घाबरत आहात? इस्रायलला की अमेरिकेला? इतक्या मोठ्या नेत्याची हत्या झाली आहे. नेल्सन मंडेला यांच्यासारख्या नेत्यांनीही त्यांना मान दिला होता. मंडेला इराणमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी खामेनी साहेबांना आपला नेता म्हटले होते. मग नेल्सन मंडेला दहशतवादी ठरतात का? तसेच इराणवरील हल्ल्यामुळे इस्रायल आणि अमेरिका सोडून संपूर्ण जगाला याची किंमत मोजावी लागणार आहे आणि विशेषतः हिंदुस्थानला. मोदींच्या गळ्यात लटकलेल्या पदकामुळे देशातील महागाई कमी होणार नाही असेही संजय राऊत म्हणाले.


























































