सामना अग्रलेख – पाकिस्तानच्या कर्माची फळे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धात गेल्या चार दिवसांत दोन्ही बाजूंचे चारशेहून अधिक सैनिक ठार झाले. तालिबानी अतिरेकी आत्मघातकी हल्ले घडवतात म्हणून पाकिस्तानने हे युद्ध सुरू केले. मात्र रशिया व अमेरिकेलाही पळवून लावणाऱ्या अफगाणिस्तानसमोर पाकिस्तानचा निभाव लागेल काय? शिवाय जिहादी हल्ल्यांवरून अफगाणवर हवाई हल्ले करण्याचा नैतिक अधिकार पाकिस्तानला आहे काय? एका बाजूला हिंदुस्थानशी वैर, दुसरीकडे तालिबानशी लढाई आणि तिसरीकडे बलुचिस्तानात सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष अशा संकटांनी पाकिस्तान पुरता काेंडीत सापडला आहे. इराण-इस्रायलपाठोपाठ आता तालिबान-पाकही एकमेकांच्या जिवावर उठले आहेत, पण या युद्धासाठी अफगाणच्या तालिबानी राजवटीला दोष देऊन काय उपयोग? ही कर्माची फळे आहेत व यापुढेही पाकिस्तानला ती भोगावीच लागतील!

इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाचा भडका उडालेला असतानाच हिंदुस्थानच्या शेजारी असलेल्या अफगाणिस्तान व पाकिस्तानातही युद्धाला तोंड फुटले आहे. अफगाणिस्तानने थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत, तर पाकिस्ताननेही काबूलपर्यंत हवाई हल्ले व बॉम्ब वर्षाव केला. चार दिवसांपासून सुरू असलेले हे युद्ध दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. इराणवरील हल्ल्यापूर्वीच अफगाणची तालिबान राजवट व पाकिस्तानात युद्धाची ठिणगी पडली असली तरी जागतिक पातळीवर या युद्धाची चर्चा तुलनेने कमी होताना दिसते. अर्थात, इराणवरील हल्ल्यात महासत्ता अमेरिका सहभागी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांनी अफगाण-पाकपेक्षा अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यातील युद्धकथांना अधिक महत्त्व दिले व ते साहजिकच आहे. मात्र हिंदुस्थानपासून अवघ्या 400 ते 500 किलोमीटर अंतरावर सुरू असलेल्या पाक-अफगाण युद्धाकडे आपल्याला शेजारी देश म्हणून डोळेझाक करता येणार नाही. अफगाणिस्तान व पाक यांच्यातील खुल्या युद्धाला आता चार दिवस उलटले असले तरी या संघर्षाचे मूळ दडले आहे ते 22 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी सैन्याने अचानक केलेल्या हवाई हल्ल्यात. पाकिस्तानात दहशतवादी हल्ले घडवणाऱ्या तहेरिक-ए-तालिबान-पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेला अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचा पाठिंबा आहे, असा आरोप करून पाकिस्तानने अफगाणिस्तानातील खोस्त पक्तिका, नंगरहार, कंदाहार आणि कुनार या प्रांतांवर

अचानक हवाई हल्ले

चढवले. या भागांतील दहशतवादी अड्डय़ांमधून टीटीपीला शस्त्रास्त्रे व दारूगोळ्याची रसद पुरवली जात असल्यामुळे आम्ही हे हल्ले केले, असा दावा पाकिस्तानने केला आहे. तालिबान राजवटीने अर्थातच हा दावा फेटाळला व पाकिस्तानच्या हल्ल्यात महिला व लहान मुलांसह 52 निरपराध नागरिक मृत्युमुखी पडल्याने त्याचा बदला घेण्याची घोषणा केली. तिथून युद्धाला तोंड फुटले. अफगाणिस्तानच्या तालिबानी सैनिकांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत त्यांच्या अनेक चौक्यांवर हल्ले चढवले. या कारवाईत 55 पाकिस्तानी सैनिक ठार झाले व पाकिस्तानच्या 15 चौक्या तालिबानने ताब्यात घेतल्या. इतकेच नाही, तर इस्लामाबादेतील पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयावरही तालिबानने हल्ला केला. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताने रावळपिंडीतील जो नूरखान हवाई तळ उद्ध्वस्त केला होता, त्या लष्करी हवाई तळावरही तालिबानने भयंकर हल्ला चढवला. बलुचिस्तानमधील क्वेट्टा, खैबर पख्तूनख्वा आदी ठिकाणच्या पाक लष्करी तळांवरही तालिबानने भीषण हल्ले चढवले. पाकिस्तानने केलेल्या बॉम्बहल्ल्यांना उत्तर म्हणून आम्ही ही कारवाई केल्याचे तालिबानने म्हटले आहे. तालिबानच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी अफगाण हद्दीत जाऊन हवाई हल्ले सुरू केले आहेत. अफगाणिस्तानची राजधानी काबूल व बगराम हवाई तळावर पाकिस्तानने केलेला हल्ल्याचा प्रयत्न अफगाणिस्तानने उधळून लावला. मात्र अजूनही दोन्ही देशांमध्ये सीमेवर तुंबळ धुमश्चक्री सुरू आहे. युद्धाची कळ काढणाऱ्या पाकिस्तानने आता हे युद्ध थांबवावे म्हणून ओमान, सौदी अरेबिया, कतार या आखाती देशांकडे मध्यस्थीसाठी धाव घेतली आहे. मात्र आखाती देशांवरच इराणचे क्षेपणास्त्र हल्ले सुरू असल्याने

पाकिस्तानचे रडगाणे

ऐकण्याएवढा वेळ सौदी व अन्य देशांकडे सध्या तरी नाही. मुळात दहशतवादाचे हे ब्रह्मराक्षस निर्माण केले कोणी? अफगाणिस्तानवर अमेरिकेने कब्जा केल्यानंतर तालिबानचे हक्कानी नेटवर्क किंवा टीटीपी या संघटनांना पाठबळ पाकिस्तानी सैन्यानेच दिले होते. शस्त्रास्त्रे, दारूगोळा व लष्करी प्रशिक्षणाचे धडे देणाऱ्या पाकिस्तानी सैन्यावरच आता या संघटना उलटल्या असतील तर त्याचा दोष या संघटनांचे पालनपोषण करणाऱ्या पाकिस्तानचाच आहे. भारतात जम्मू-कश्मीरपासून मुंबईपर्यंत दहशतवादी पाठवून जिहादी हल्ले करणारा पाकिस्तान आज स्वतःच तहेरिक-ए-तालिबानच्या दहशतवादी हल्ल्यांनी बेजार झाला आहे. मध्य-पूर्वेत इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्यात युद्ध पेटले असतानाच अफगाण व पाक यांच्यातही भयंकर धुमश्चक्री सुरू आहे. पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धात गेल्या चार दिवसांत दोन्ही बाजूंचे चारशेहून अधिक सैनिक ठार झाले. तालिबानी अतिरेकी आत्मघातकी हल्ले घडवतात म्हणून पाकिस्तानने हे युद्ध सुरू केले. मात्र रशिया व अमेरिकेलाही पळवून लावणाऱ्या अफगाणिस्तानसमोर पाकिस्तानचा निभाव लागेल काय? शिवाय जिहादी हल्ल्यांवरून अफगाणवर हवाई हल्ले करण्याचा नैतिक अधिकार पाकिस्तानला आहे काय? एका बाजूला हिंदुस्थानशी वैर, दुसरीकडे तालिबानशी लढाई आणि तिसरीकडे बलुचिस्तानात सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष अशा संकटांनी पाकिस्तान पुरता कोंडीत सापडला आहे. इराण-इस्रायलपाठोपाठ आता तालिबान-पाकही एकमेकांच्या जिवावर उठले आहेत, पण या युद्धासाठी अफगाणच्या तालिबानी राजवटीला दोष देऊन काय उपयोग? ही कर्माची फळे आहेत व यापुढेही पाकिस्तानला ती भोगावीच लागतील!