
मध्यपूर्वेत सध्या घमासान युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायली हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांचा मृत्यू झाला आणि युद्ध आणखीनच पेटले. इराणने आखातातील अमेरिकन लष्करी तळांवर आणि इस्रायलवर जबरदस्त हल्ले चढवले. यामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट घोंघावत आहे. अशातच इराणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अयातुल्लाह अली खामेनी यांचा मोठा मुलगा मोजताबा खामेनी यांची इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. इराणच्या ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स’ने या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिले आहे.
मोजताबा खामेनी (वय – 56) हे अयातुल्लाह अली खामेनी यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. इराणमधील अत्यंत शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या ‘इराण रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’च्या दबावाखाली मोजताबा यांची सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे इराणमध्ये घराणेशाहीला मोठा विरोध असल्याने मोजताबा यांचे नाव यापूर्वी चर्चेत नव्हते, मात्र युद्धजन्य परिस्थिती पाहता लष्कराने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते.
🚨BREAKING: Mojtaba Hosseini Khamenei, son of Former Ayatollah Ali Khamenei, has been elected the next Supreme Leader of Iran. pic.twitter.com/PYaV4f2Xer
— Spencer Hakimian (@SpencerHakimian) March 3, 2026
कोण आहेत मोजताबा खामेनी?
मोजताबा यांचा जन्म 1969 मध्ये मशहद येथे झाला. त्यांनी इराण-इराक युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. मोजताबा यांनी आजवर कोणतेही अधिकृत सरकारी पद भूषवलेले नाही, मात्र वडिलांच्या कार्यालयातून ते पडद्यामागून मोठी सूत्रे हलवत असत. आयआरजीसी या निमलष्करी दलाशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. 2019 मध्ये अमेरिकेने मोजताबा यांच्यावर निर्बंध लादले होते. त्यांच्यावर मानवी हक्कांचे उल्लंघन आणि वडिलांच्या वतीने बेकायदेशीर कारवायांचे आरोप होते.
…म्हणून मोजताबा यांच्याकडे सुत्र
दरम्यान, इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकात बापानंतर मुलगा अशा वारसाहक्काला धार्मिक स्तरावर फारसे चांगले मानले जात नाही. खुद्द अयातुल्लाह अली खामेनी यांनीही गेल्या वर्षी तयार केलेल्या संभाव्य वारसांच्या यादीत मोजताबा यांचे नाव टाळले होते. मात्र, शनिवारी अमेरिका-इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे या हल्ल्यातून मोजताबा सुरक्षित राहिल्याने त्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
मोजताबांच्या हालचालींकडे मोसादचे लक्ष
दरम्यान, इस्रायल -अमेरिका विरुद्ध इराण असा संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच मोजताबा यांची सर्वोच्च नेतेपदी निवड झाली आहे. आता मोजताबा युद्धाची दिशा कशी ठरवतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे मोसाद आणि इस्रायली गुप्तचर यंत्रणा आता मोजताबा यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

























































