
इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांचा इस्रायलच्या हवाई हल्ल्यात शनिवारी मृत्यू झाला. इराणची राजधानी तेहरानच्या पाश्चर स्ट्रीटजवळ त्यांच्या कार्यालयावर हा हल्ला झाला होता. हल्ला झाला त्यावेळी ते इराणचे महत्त्वाचे नेते आणि लष्कराच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक करत होते.
खामेनी हे दीर्घकाळापासून इस्रायलच्या निशाण्यावर होते. अनेक वर्षांपासून इस्रायलने हल्ल्याची तयारी केली होती. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने तेहरानमधील जवळपास सर्व सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केले होते. इराणच्याच कॅमेऱ्यांमधून खामेनी यांच्यावर पाळत ठेवली जात होती. खामेनी यांच्या बैठकीबाबत नेमकी माहिती मिळताच इस्रायलने त्या इमारतीवर 30 पेक्षा जास्त क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. हा इस्रायलच्या टार्गेटिंग इंटेलिजन्सचा भाग होता.
ब्रिटिश माध्यमांनी यासंदर्भात केलेल्या दाव्यानुसार, खामेनी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे दीर्घकालीन नियोजन होते. मोसाद आणि युनिट 8200 ने तेहरानमधील सर्व ट्रफिक कॅमेरे हॅक केले होते. खामेनी यांच्या कार्यालयाजवळच्या प्रत्येक चौकातील सीसीटीव्ही इस्रायलच्या नियंत्रणात होता. कॅमेऱ्यातून मिळालेली छायाचित्रे तेल अवीव आणि दक्षिण इस्रायलच्या सर्व्हरवर पाठवण्यात येत होती. अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सीआयए’नेदेखील या मोहिमेत मदत केली. एका ठिकाणी एक खास पॅमेरा होता. पुरेशी माहिती जमा झाल्यानंतर अचूक कारवाईची योजना आखण्यात आली. स्थान, वेळ आणि सुरक्षा व्यवस्थेतील उणिवा ओळखून पुढील रणनीती ठरवली गेली. यानंतर शनिवारी इस्रायलने अमेरिकेसोबत केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह 40 अधिकाऱ्यांचादेखील मृत्यू झाला.
संपूर्ण दिनचर्येचे विश्लेषण
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अंगरक्षक आणि चालक त्यांच्या खासगी गाडय़ा कुठे पार्क करतात, याची माहिती त्यातून मिळत होती. त्यातून सुरक्षा कर्मचारी तसेच अंगरक्षकांच्या हालचालींचे विश्लेषण करण्यात आले. सुरक्षा रक्षकांची डय़ुटी कधी बदलते, कोणत्या मार्गाने ये-जा होते इत्यादी माहितीतून नियमित दिनचर्या इस्रायलच्या हाती लागली.
मोबाईल टॉवर्सदेखील इस्रायलच्या ताब्यात
मोसाद आणि सीआयएने इराणच्या मोबाईल नेटवर्कमध्येही मोसादने घुसखोरी केली होती. पाश्चर स्ट्रीटच्या परिसरातील सर्व मोबाइल फोन टॉवर्स हॅक करण्यात आले होते. हल्ल्याच्या वेळी सर्व टॉवर्सवरील नेटवर्क जाम करण्यात आले होते, जेणेकरून हल्ल्याच्या वेळी संपूर्ण नेटवर्क व्यस्त होते आणि सुरक्षा पथकांना कोणतीही माहिती मिळायला नको. इस्रायलचे गुप्तचर अधिकारी तेहरानचा कानाकोपरा ओळखतात. जेवढी माहिती त्यांना जेरुसलेमची आहे, तेवढीच माहिती तेहरानची या अधिकाऱ्यांना आहे.

























































