
प्रसिद्ध हृदयशल्यविशारद डॉ. अनिलकुमार यांचे आज वरळी येथील निवासस्थानी आकस्मिक निधन झाले. हजारो रुग्णांना नवजीवन देणारे डॉ. अनिलकुमार यांनी सकाळी झोपेतच अखेरचा श्वास घेतला. 75 व्या वाढदिवशीच त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
पार्किन्सन आणि स्लिप ऑप्नियाच्या त्रासावर मात करून डॉ. अनिलकुमार सर जे.जे. रुग्णालयात मानसेवी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. आज पहाटे 5 वाजता प्रातःर्विधी आटोपल्यानंतर ते पुन्हा झोपी गेले. आठ वाजता त्यांच्या पत्नी त्यांना उठवण्यासाठी गेल्या असता काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तातडीने डॉक्टरांना बोलवण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले.
गेल्या पाच दशकांपासून डॉ. अनिलकुमार वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते. हृदयशल्यचिकित्सेमध्ये असंख्य गुंतागुंतीची प्रकरणे त्यांनी यशस्वीरित्या हाताळली होती. कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग, हार्ट फेल्युअर, हार्ट ट्रान्सप्लांट, हार्ट व्हॉल्व्ह रिपेअर, हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज, स्टेंटिंग आणि अँजिओप्लास्टी आदी गुंतागुंतीच्या उपचारांमध्ये त्यांचा हातखंडा होता. अनेकदा त्यांनी स्वखर्चाने गोरगरीब रुग्णांवर उपचार केले.
डॉ. अनिलकुमार यांनी नायर रुग्णालय, जे.जे. रुग्णालय, मुंबई रुग्णालयात कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम केले होते. अलीकडच्या काळात ते राजकीय क्षेत्रातही सक्रिय होते. वरळी येथील वैपुंठभूमीतील विद्युतदाहिनीत डॉ. अनिलकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वैद्यकीय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली






















































