Mumbai crime news – जेवण्याच्या वादातून मेहुण्याची हत्या, आरोपीला बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

जेवण्याच्या वादातून भावोजीने मेहुण्याची हत्या केल्याची घटना विलेपार्ले परिसरात घडली. सागर गुप्ता असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी आकाश मौर्याला विमानतळ पोलिसांनी अटक केली.

आकाश हा पत्नी ममतासोबत विलेपार्ले परिसरात राहतो. त्याला दारूचे व्यसन होते. त्यावरून ममता आणि आकाशचा नेहमी वाद होत असायचा. अनेकदा त्याच्या भांडणात नातेवाईक हे मध्यस्थी करायचे. रविवारी सागर हा ममताच्या घरी गेला होता. त्यावेळी आकाश घरी आला आणि त्याने ममताला जेवण देण्यास सांगितले. तेव्हा ममताने जेवण बनविले नाही असे त्याला सांगितले.

यावरून आकाश आणि ममतामध्ये शाब्दिक वाद झाला. तेव्हा सागरने शिवीगाळ करू नको असे त्याला समजावले. त्यावरून दोघांमध्ये प्रचंड वाद झाला आणि दोघांत हाणामारी झाली.  या झटापटीत आकाशने सागरच्या मानेवर चाकूने वार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच विमानतळ पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी आकाशविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच आकाशला विमानतळ पोलिसांनी अटक केली.

प्रियकराचा धिंगाणा 

प्रेयसीसोबत झालेल्या भांडणानंतर प्रियकराने पोलीस ठाण्यात धिंगाणा घातल्याची घटना घडली. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.  प्रियकर हा दक्षिण मुंबईत राहतो. त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. रविवारी त्याचे प्रेयसीसोबत भांडण झाले. भांडण झाल्यानंतर प्रेयसी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आली. तिने घडल्या प्रकाराची माहिती सांताक्रूझ पोलिसांना दिली.

खंडणीसाठी धमकी

शेअर ब्रोकरला पाच कोटींच्या खंडणीसाठी पह्न आल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे शेअर ब्रोकर आहेत. गेल्या महिन्यात ते घरी होते तेव्हा त्यांना अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅप मेसेज केला. मेसेज करून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. जर खंडणीची रक्कम दिली नाही तर त्याच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारू अशी धमकी दिली. वारंवार धमकीचे पह्न येत असल्याने त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हे शाखेचे अधिकारी याप्रकरणी तपास करीत आहेत.