
अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यातील युद्धामुळे चार-पाच दिवसांपासून दुबईत अडकलेले हुपरी (ता. हातकणंगले) येथील 23 जणांचा ग्रुप आज सुखरूप घरी पोहोचला. त्यामुळे कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या काळात झालेल्या मनस्तापाबद्दल दुबई प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करीत प्रत्येकी एक हजार दिराम (भारतीय चलनातील 26 हजार रुपये) भेट दिले.
हुपरी येथील 23 जणांचा ग्रुप पर्यटनासाठी दुबई येथे गेला होता.अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये जेथे हा ग्रुप राहिला होता, त्या हॉटेलच्या आजूबाजूला हल्ले झाले होते. त्यामुळे जीव मुठीत घेऊन हा ग्रुप दुबईमधून अबुधाबीला रस्तेमार्गाने बाहेर पडला. सुदैवाने हिंदुस्थानात येणाऱया दोन विमानांपैकी एका विमानाचे बुकिंग या ग्रुपने केले होते. सकाळी मुंबईत आणि त्यानंतर आज ते घरात पोहोचल्याने कुटुंबीयांच्या आनंदालाही पारावार राहिला नाही. दुबईमध्ये होणारे हल्ले, विमानतळाची अवस्था आणि हल्ले झाल्यानंतर धुराचे लोट याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचे या ग्रुपमधील शीतल चंद्रकांत बारगे यांनी सांगितले.
24 फेब्रुवारी रोजी आम्ही दुबईमध्ये पोहोचलो होतो. दुबई, अबुधाबी, शारजाह यांसह अन्य पर्यटन केंद्रांना आम्ही भेटी दिल्या होत्या. नऊ दिवसांचा हा प्रवास संपवून आम्ही हिंदुस्थानात परतण्यासाठी दुबई विमानतळावर पोहोचलो. मात्र, तेव्हाच विमानतळाच्या आजूबाजूला स्फोटांचे आवाज येऊ लागले. यामुळे आम्ही घाबरून गेलो होतो. परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही अबुधाबीसाठी बसने निघालो आणि या ठिकाणाहून आमच्या विमानाने हिंदुस्थानकडे उड्डाण घेतले.
हुपरीतील तुकाराम कणसे, राजाराम राऊत, जयश्री बारगे, समरजीत बारगे, तुकाराम हातकर, राजाराम हातकर, बाळासाहेब हातकर यांच्यासह अन्य सहकाऱयांचा गुपमध्ये समावेश होता. तसेच झालेल्या त्रासाबद्दल दुबई सरकारने दिलगिरी व्यक्त करून 23 जणांना प्रत्येकी 26 हजारांचे गिफ्ट दिल्याचे शीतल बारगे यांनी सांगितले.
























































