
संदीप जाधव
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेली तारापूर एमआयडीसी सध्या भोपाळच्या वाटेवर आहे. वारंवार होणारी वायुगळती, स्फोट आणि आगीच्या घटनांमुळे परिसरातील विविध गावांमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या वर्षभरात तारापूर एमआयडीसीमध्ये सहा वेळा वायुगळती झाली तर अनेकदा स्फोट व आगीच्या संकटाला सामोरे जावे लागले. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसल्याने कामगारांची ही सुरक्षा ऐरणीवर आली आहे. भोपाळसारखी एखादी महाभयानक घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालघर जिल्ह्याच्या बोईसरमध्ये तारापूर एमआयडीसी असून ती १९६७ साली स्थापन झाली. देशातील सर्वात मोठे रसायनिक, औद्योगिक क्षेत्र म्हणून या एमआयडीसीकडे पाहिले जाते. याठिकाणी एकूण १ हजार २३६ कारखाने असून त्यापैकी ५०१ कारखाने हे फक्त केमिकलचे आहेत. या कारखान्यांमधून अनेकदा वायुगळती झाल्याने कामगारांसह परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अत्याधुनिक आपत्कालीन यंत्रणेची कमतरता, पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष यामुळे तारापूर एमआयडीसी ही सध्या धोकादायक पातळीवर आहे.
सोमवारी बगेरिया केमिकलमध्ये ओलियम या वायूची गळती झाल्याने पुन्हा एकदा तारापूर एमआयडीसीतील ‘केमिकल लोचा’ समोर आला आहे.
२ व ३ डिसेंबर १९८४ रोजी युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड या कंपनीत मिथाईल आयसोसायनेट या अत्यंत विषारी वायूची गळती झाली होती. संपूर्ण जगाचा थरकाप उडवणाऱ्या या दुर्घटनेत ४ हजारांहून अधिक निरपराध नागरिकांचा बळी गेला होता.
तारापूर एमआयडीसीमध्येही सुमारे ५०० केमिकल कारखाने असूनही तेथील सुरक्षेकडे व वारंवार होणाऱ्या स्फोट, आग व वायुगळतीच्या घटनांकडे दुर्लक्ष होत आहे.
दुर्घटनांचा आलेख
१९ मे २०२५ कॅमलिन फाईन सायन्स लिमिटेड या कंपनीच्या युनिटमध्ये डायमिथिल सल्फेट वायुगळती झाली. त्याची १३ कामगारांना बाधा १३ जुलै २०२५ ‘आरती ड्रग्ज’मध्ये ब्रोमिन वायुगळती. सुदैवाने जीवितहानी टळली.
२१ ऑगस्ट २०२५ मेडली फार्मासिटिकल लिमिटेड या कंपनीत उत्पादनाची प्रक्रिया सुरू असताना विषारी वायूची गळती. सहा कामगार गंभीर जखमी.
८ सप्टेंबर २०२५ ‘आरती ड्रग्ज’मध्ये हायड्रोक्लोरिक वायूची गळती.
२५ फेब्रुवारी २०२६ – विनायक केमेक्समध्ये क्लोरिन वायूची गळती. त्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण.
२ मार्च २०२६ बगेरिया केमिकल्समध्ये ओलियम वायूची गळती. कामगार व नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम.



























































