हिंदुस्थान आणखी पाच एस-400 खरेदी करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान रशियाकडून आणखी पाच नवीन एस-400 हवाई संरक्षण सिस्टम खरेदी करण्याचा विचार करत आहे. संरक्षण मंत्रालय हवाई दलाकडे प्रस्ताव पाठवणार आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर दरम्यान एस-400 सिस्टमने चांगली कामगिरी केल्याने हिंदुस्थानने आणखी पाच सिस्टम खरेदी करण्यावर सहमती दर्शवली आहे.

नवीन एस-400 सिस्टम खरेदी केल्यानंतर याला पूर्व आणि पश्चिम दोन्ही सीमेवर तैनात केले जाईल. यामुळे चीन पाकिस्तान दोन्ही देशांच्या बाजूकडील हवाई सुरक्षा मजबूत होईल, असे एका संरक्षण अधिकाऱ्याने म्हटले आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान एस-400 सिस्टमने पाकिस्तानच्या पाच ते सहा विमानांना आणि एका हेरगिरी करणाऱ्या विमानाला 300 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून खाली पाडले होते. हवाई दलाने या सिस्टमला गेम चेंजर म्हटले होते. हिंदुस्थान आणि रशिया यांच्यात 2018 मध्ये एस-400 सिस्टमचे 5 स्क्वॉड्रन खरेदी करण्याचा करार झाला होता. आतापर्यंत यापैकी तीन स्क्वॉड्रन हिंदुस्थानी वायुदलात कार्यान्वित झाले आहेत. तर उर्वरित पुरवठय़ाची प्रक्रिया सुरू आहे.

एस-400 सिस्टम काय आहे?

एस-400 सिस्टम ही रशियाची एक अत्याधुनिक क्षेपणास्त्र सिस्टम आहे. ही सिस्टम फायटर जेट्स, बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रs, ड्रोन आणि स्टेल्थ विमानांनाही पाडू शकते. ही हवेतील अनेक प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षणासाठी एक मजबूत ढाल म्हणून काम करते. या सिस्टमचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे याला रस्त्याने ते कुठेही आणले किंवा नेले जाऊ शकते. आदेश मिळाल्यानंतर अवघ्या पाच ते दहा मिनिटांतच हे ऑपरेशनसाठी तयार होते.