US Israel Iran War – तेहरानमध्ये पुन्हा स्फोटांचे आवाज, मृतांची संख्या १००० च्या पार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायलने सुरू केलेल्या संयुक्त कारवाईनंतर चार दिवस झाले तरी दोन्ही बाजूने सुरू असलेले क्षेपणास्त्र हल्ले काही थांबण्याचे नाव घेत नाहीत असं चित्र आहे. गुरुवारी पहाटेच्या वेळात तेहरानमध्ये पुन्हा क्षेपणास्त्र पडले असून स्फोटांच्या आवाजांनी इराण हादरले आहे.

इराणवर अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धाचा भडका आता अधिक वेगाने पसरू लागला आहे. क्षेपणास्त्रांचा पाऊस, समुद्रातील भीषण हल्ले आणि प्रादेशिक तणावामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती गेल्या अनेक दशकांतील सर्वात धोकादायक वळणावर पोहोचली आहे. इराणने इस्रायलवर पुन्हा एकदा ताज्या क्षेपणास्त्रांचा मारा केला असून, याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या तळांवर हल्ले अधिक तीव्र केले आहेत. दुसरीकडे, हिंदी महासागरात एका अमेरिकन पाणबुडीने इराणची युद्धनौका बुडवल्याने समुद्रातही युद्धाचा भणका उडाला आहे.

या युद्धात जीवितहानीचा आकडा सातत्याने वाढत आहे. इराणमध्ये आतापर्यंत १,००० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, तर लेबनॉन आणि इस्रायलमध्ये डझनाहून अधिक लोक मारले गेले आहेत. राजधानी तेहरानवर सध्या सतत बॉम्बफेक सुरू असून, अयातुल्ला अली खामेनी यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू असल्याने इराणच्या राजकीय भविष्याबाबतही मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, राजधानी तेहरानमधून हजारो लोकांनी स्थलांतर केले आहे.

वॉशिंग्टनमध्ये, सिनेटमधील रिपब्लिकन पक्षाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे युद्ध अधिकार मर्यादित करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे, ज्यामुळे या लष्करी कारवाईला मोठे राजकीय पाठबळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हाईट हाऊसने सध्या तरी अमेरिकन पायदळ (Ground Troops) या युद्धाचा भाग नसल्याचे म्हटले आहे, मात्र भविष्यात ही शक्यता पूर्णपणे नाकारलेली नाही.

या संघर्षाचा जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावरही मोठा परिणाम होत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी, कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असून आर्थिक बाजारपेठेत घबराट पसरली आहे. वाढत्या सुरक्षा जोखमीमुळे अनेक मोठ्या जहाज कंपन्यांनी आपले मार्ग तात्पुरते बंद केले आहेत.

इराणी वृत्तसंस्था ‘तस्नीम’ने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, तेहरानमध्ये अनेक मोठे स्फोट ऐकू आले असून इराणने आपली संरक्षण यंत्रणा सक्रिय केली आहे. इराणने गुरुवारी पहाटे इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर हे स्फोट झाले आहेत.

इराणच्या इशाऱ्यानंतर जेरुसलेममध्ये स्फोटांचे आवाज

इराणकडून क्षेपणास्त्र हल्ल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर गुरुवारी जेरुसलेममध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले, असे ‘एएफपी’च्या पत्रकारांनी सांगितले. मात्र, इस्रायलच्या आपत्कालीन सेवांनी सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त दिलेले नाही. इस्रायली लष्कराने दोन तासांत तीन वेळा क्षेपणास्त्र हल्ल्याचा इशारा दिला. मात्र, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे कोणतेही वृत्त नसून नागरिकांना आश्रयस्थानातून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दोन्ही बाजूंनी अशा प्रकारे क्षेपणास्त्रांचे मारे सुरू राहिले आणि युद्धाची व्याप्ती वाढली तर येणारा काळ जगासाठी धोकादायक ठरणार आहे. या काळात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्याप्रमाणात वाढण्याची शक्यता आहे, त्याची परिणिती थेट महागाई वाढण्यात होणार आहे.