बिहारमधील नितीशराज संपुष्टात… ‘ती’ इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्यसभेवर जाण्याचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जनता दल (यु) पक्षाचे प्रमुख आणि तब्बल 10 वेळा बिहारचे मुख्यमंत्रिपद भूषवणारे नितीश कुमार हे राज्यसभेवर जाण्यास सज्ज झाले आहेत. बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होऊन आपण राज्यसभेची जागा लढवणार असल्याचे नितीश कुमार यांनी गुरुवारी एक्सवर पोस्ट करत स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपद सोडून राज्यसभेवर जाण्यामागे आपली एक इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.

नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्यसभेवर जाणार अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाली. यावर आता त्यांनी स्वत: शिक्कामोर्तब केला असून पहिली प्रतिक्रियाही दिली आहे. बिहार विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा (विधानसभा आणि विधानपरिषद) तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहांचा (लोकसभा आणि राज्यसभा) सदस्य बनण्याची माझी जुनी इच्छा पूर्ण करायची आहे, असे नितीश कुमार म्हणाले. ही इच्छा पूर्ण करण्यासाठीच नितीश कुमार यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

नितीश कुमार म्हणाले, गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तुम्ही तुमचा विश्वास आणि पाठिंबा माझ्यावर सतत कायम ठेवला आहे आणि त्याच जोरावर आम्ही बिहारची व तुम्हा सर्वांची पूर्ण निष्ठेने सेवा केली आहे. तुमच्या विश्वास आणि पाठिंब्याचीच ही ताकद होती की, ज्यामुळे बिहार आज विकास आणि सन्मानाचा नवा आयाम प्रस्थापित करत आहे. यासाठी यापूर्वीही मी अनेकदा तुमच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

संसदीय जीवन सुरू केल्यापासूनच माझ्या मनात एक इच्छा होती की, मी बिहार विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या (विधानसभा आणि विधानपरिषद) सोबतीने संसदेच्या दोन्ही सभागृहांचाही (लोकसभा आणि राज्यसभा) सदस्य बनावे. याच अनुषंगाने, यावेळी होत असलेल्या निवडणुकीत मी राज्यसभेचा सदस्य होऊ इच्छितो, असे नितीश कुमार यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले.

मी तुम्हाला पूर्ण प्रामाणिकपणे विश्वास देऊ इच्छितो की, तुमच्यासोबतचे माझे हे नाते भविष्यातही कायम राहील आणि तुमच्यासोबत मिळून एक विकसित बिहार घडवण्याचा संकल्प पूर्वीप्रमाणेच ठाम राहील. जे नवीन सरकार स्थापन होईल, त्याला माझे पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन लाभेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.