
अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या सहा दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूने क्षेपणास्त्र, ड्रोनच्या मदतीने हल्ले केले आहेत. अशातच आता अमेरिकेचे नौदलही सक्रिय झाले असून इराणच्या नौदलावर प्रचंड प्रहार करत आहे. याच दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याच्या कामगिरीचे तोंड भरून कौतुक करत 10 पैकी 15 गुण दिले आहेत. ते बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये बोलत होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी इराणसोबतच्या युद्धात अमेरिकन सैन्याच्या कामगिरीला रेटिंग दिले आहे. या संघर्षात अमेरिका आणि त्याचे मित्रराष्ट्र वरचढ ठरत आहेत. युद्धाच्या आघाडीवर आम्ही चांगली कामगिरी करत आहोत, असे म्हणणे अल्प ठरेल. कोणीतरी विचारले की, 10 च्या स्केलवर तुम्ही याला किती गुण द्याल? मी म्हणालो, सुमारे 15, असे ट्रम्प यांनी सांगितले. तसेच एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत या मोहिमेने वेगाने प्रगती केल्याचे त्यांनी म्हटले.
या लष्करी मोहिमेदरम्यान इराणी नेतृत्वातील महत्त्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करणे सुरू असल्याने अमेरिका आता अत्यंत मजबूत स्थितीत आहे. आम्ही आता खूप शक्तिशाली स्थितीत आहोत आणि इराणचे नेतृत्व वेगाने संपुष्टात येत आहे. जो कोणी नेता बनू इच्छितो, तो मारला जात आहे, असे ट्रम्प यांनी नमूद केले.
ही मोहीम तेहरानच्या सर्वात महत्त्वाच्या शस्त्रास्त्र प्रणालींपैकी एक वेगाने नष्ट करत आहे. त्यांचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा वेगाने संपुष्टात आणला जात आहे, असेही ट्रम्प यांनी सांगितले. तसेच इराणवर हल्ला करण्याच्या निर्णयाचेही त्यांनी समर्थन केले. इराण अण्वस्त्रे मिळवण्याच्या जवळ जात असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. जेव्हा वेड्या लोकांकडे अण्वस्त्रे असतात, तेव्हा वाईट गोष्टी घडतात, असे ट्रम्प म्हणाले.


























































