
शेअर बाजारात तीन दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर गुरुवारी चांगली वाढ दिसून आली आहे. अमेरिका, इस्रायल इराण युद्धाच्या सावटात बाजाराची सकारात्मक सुरुवात झाल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला होता. मात्र, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दुसरे सत्र सुरू होताच परत बाजारात घसरगुंडीला सुरुवात झाली. युद्धाची तीव्रता, तेल पुरवठा, सोन्या-चांदीतील चढउतार यामुळे बाजारात संभ्रमाचे वातावरण असून बाजारात गुरुवारी मोठे चढ उतार दिसून येत आहेत.
तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण झपाट्याने झाली होती. मात्र, गुरुवारी शेअर बाजारात शानदार तेजी दिसून आली. सेन्सेक्स ४४० अंकांनी म्हणजेच ०.५६ टक्क्यांनी वाढून ७९,५५५ वर व्यवहार करत होता. तर निफ्टी १६० अंकांनी म्हणजेच ०.६५ टक्क्यांनी वाढून २४,६४० वर पोहोचला. निफ्टी बँकतही २२० अंकांची वाढ दिसून आली. मात्र, दुपारचे सत्र सुरू होण्यापुर्वी बाजारात पुन्हा घसरण दिसून आली. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये घसरण झाली आणि तो 293.33 अंकाच्या म्हणजे 0.37 टक्क्यांच्या वाढीसह 79,408.29 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 116.70 अंकांनी म्हणझेच 0.48% च्या वाढीसह 24,607 . 9 वर व्यवहार करत होता. तर बँक निफ्टी लाल निशाणीत गेला होता.
सकाळच्या सत्रात बीएसईच्या टॉप ३० शेअर्सपैकी १६ शेअर्स वधारले, तर उर्वरित १४ शेअर्समध्ये घसरण झाली. हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटी शेअर्समध्ये सर्वात जास्त घसरण झाली. रिलायन्सचे शेअर्स ३ टक्के, एनटीपीसीचे २.४० टक्के आणि टाटा स्टीलचे २ टक्के वाढले. आता देशातील शेअर बाजार लक्षणीयरीत्या घसरला आहे. गेल्या तीन दिवसांत गुंतवणूकदारांचे२२ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खालच्या पातळीवरून खरेदी होत आहे. त्यामुळे बाजारात गुरुवारी तेजी दिसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
आशियाई बाजारातही वाढ दिसून आली आहे. जपानी शेअर बाजार २.५० टक्क्यांनी वाढला आहे. अमेरिकन बाजारातही संमिश्र परिणाम दिसून आले आहेत. शिवाय, दक्षिण कोरियाच्या बाजारात १० टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ५१ पैशांनी वधारून ९१.५४ वर पोहोचला आहे. इंडिया VIX (अस्थिरता निर्देशांक) जवळजवळ १० टक्क्यांनी घसरून १९.०४ वर पोहोचला आहे.

























































