
‘चलो, बॅग भरो अन् निकल पडो…’ असे म्हणत 2025 मध्ये 3.27 कोटी लोकांनी विदेश दौरा केला आहे. या दौऱ्यात हिंदुस्थानी पर्यटकांनी संयुक्त अरब अमिरात (यूएई), सौदी अरब आणि थायलंड या देशांना सर्वात जास्त पसंती दिली आहे, अशी माहिती मिनिस्ट्री ऑफ टूरिजमने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काही वर्षांपासून विदेशात जाणाऱ्या हिंदुस्थानींची संख्या वाढली आहे. 2025 मध्ये एकूण 3.27 कोटी हिंदुस्थानी नागरिकांनी विदेश दौरा केला आहे. ही संख्या आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. 2024 मध्ये 3.08 कोटी लोकांनी विदेश दौरा केला होता. गेल्या वर्षी सर्वात जास्त भेट देणाऱ्या देशांमध्ये अव्वल क्रमांक हा यूएईचा आहे. विदेशात जाणाऱ्या 100 हिंदुस्थानींपैकी 26 हून अधिक पर्यटकांनी यूएईला भेट दिली आहे. यूएई हा देश हिंदुस्थानींसाठी सर्वात पसंतीचा देश ठरला आहे. हिंदुस्थान आणि यूएईच्या दुबई तसेच अबू धाबी शहरात अनेक फ्लाईट्स उपलब्ध आहेत. कोणत्याही वेळेला सहज फ्लाईट उपलब्ध असल्याने प्रवाशांसाठी हे सोयीचे आहे.
सौदी दुसऱ्या तर थायलंड तिसऱ्या स्थानावर
विदेशात जाणाऱ्या 100 हिंदुस्थानींपैकी 10 पर्यटक हे सौदी अरबला जातात. यामध्ये जास्तीत जास्त उमरा आणि धार्मिक यात्रेसाठी जातात. अनेक लोक कामांसाठी सुद्धा या ठिकाणी जातात. तिसऱ्या स्थानावर थायलंड हा देश आहे. 100 हिंदुस्थानींपैकी जवळपास 7 जण हे थायलंडला जातात. मज्जा करण्यासाठी सर्वात जास्त पसंती थायलंडला आहे. थायलंडमध्ये स्ट्रीट मार्पेट आणि नाइटलाइफ प्रसिद्ध आहे. या ठिकाणी चविष्ट जेवण, शॉपिंग आणि एक वेगळा अनुभव घेण्यासाठी थायलंडला अनेक जण पसंती देतात. यूएई, सौदी अरब, थायलंडशिवाय, सिंगापूर, अमेरिका, ब्रिटन, मलेशिया या देशांनाही हिंदुस्थानी पर्यटकांची पसंती आहे.

























































