महाबळेश्वरात ‘अंबरग्रीस’ तस्करीचा पर्दाफाश; सातजण ताब्यात, वन विभागाची कारवाई, 5 किलो व्हेल माशाची उलटी जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय बाजारात कोटय़वधी रुपयांची किंमत असलेल्या ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) तस्करीचा प्रकार सातारा वन विभागाने उघडकीस आणला आहे. महाबळेश्वर परिसरात सापळा रचून कारवाई करीत वन विभागाने सुमारे 5.300 किलो अंबरग्रीस जप्त करीत सातजणांना ताब्यात घेतले. या प्रकरणाने खळबळ उडाली.

अतुल अशोक विश्वासराव (रा. ठाणे), आकाश श्यामसुंदर धुरी (रा. मालवण), एव्हन्स क्लेमेंट फर्नांडिस (रा. मालवण), हितेंद्र मनोहर शेठे (रा. लालबाग-परळ), कौस्तुभ मिलिंद प्रभू (रा. धनकवडी, पुणे), मोहन हरिभाऊ पाटील (रा. भांडुप, ठाणे) आणि विल्सन झुजे फर्नांडिस (रा. मालवण) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, सहायक वनसंरक्षक सातारा, वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर आणि संरक्षण पथकाने संयुक्त कारवाई करीत संशयितांवर सापळा रचला. महाबळेश्वर परिसरात आलेल्या इर्टिगा आणि टाटा नेक्सॉन या दोन वाहनांची झडती घेतली असता, त्यामध्ये अंबरग्रीसचा मोठा साठा आढळला.

वन विभागाने आरोपींकडून जप्त केलेले अंबरग्रीस या दुर्मिळ व्हेल प्रजातीशी संबंधित असल्याचे सांगितले आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम-1972अंतर्गत या पदार्थाची खरेदी-विक्री, वाहतूक किंवा साठवण करणे गंभीर गुन्हा असून, त्यासाठी सात वर्षांपर्यंत कारावास व मोठय़ा दंडाची तरतूद आहे. याप्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला असून, तस्करीच्या या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास सुरू आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते तपास करीत आहेत.

उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ, महाबळेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, वनपाल सुनील लांडगे, वनरक्षक तळदेव तुकाराम निकम, वनरक्षक मांघरबाबू मराडे, वनरक्षक हारोशी देवींद्र पोवार, वनरक्षक शिरवली अविनाश गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.