
कर्नाटकामध्ये 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत बंदी घालण्याची घोषणा केली आहे. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य बनले आहे.
सोशल मीडिया हा छोट्या मुलांसाठी एक धोका बनला आहे. 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाचा धोका टाळण्यासाठी कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात राज्य उच्च शिक्षण परिषदेच्या कुलगुरूंशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी
ऑस्ट्रेलियाचे उदाहरण देत सोशल मीडिया वापरावरील वय-आधारित निर्बंधांवर चर्चा केली. या काळात सरकारने सोशल मीडिया बंदीसाठी आंतरराष्ट्रीय मॉडेल्सचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला होता.
सोशल मीडियावर तरुणांचा वाढता प्रभाव पाहता, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि सोशल मीडियाचा जबाबदार वापर सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार काही उपाययोजना करण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे. ही एक गंभीर समस्या असून फिनलँडनेसुद्धा यावर निर्णय घेतला आहे. युनायटेड किंगडमदेखील अशाच प्रकारचे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे, असे कर्नाटकचे माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान (आयटी अँड बीटी) मंत्री प्रियांक खरगे यांनी 30 जानेवारीला कर्नाटक विधानसभेत सांगितले होते. त्यावर विचार केल्यानंतर अखेर सरकारने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलिया, फ्रान्ससह काही देशांमध्ये 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर अकाऊंट बनवण्याची परवानगी नाही, तर काही देशांमध्ये मुलांसाठी डेटा आणि स्क्रीन टाइमसंबंधी कायदे करण्यात आले आहेत.



























































