
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे चटके आता वेगवेगळ्या देशांना आणि क्षेत्रांना बसायला सुरुवात झाली आहे. हिंदुस्थानातील औषध कंपन्यांना अडीच हजार ते पाच हजार कोटींपर्यंत नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. फार्मास्युटिकल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाने (फार्मेक्सिल) दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानातील औषध कंपन्यांची एकूण निर्यातीत 5.58 टक्के भागीदारी आहे.
संयुक्त अरब अमिरात (यूएई), सौदी अरब, ओमान, कुवेत आणि यमन यांसारख्या देशांतील प्रमुख बाजारपेठा या हिंदुस्थानातील स्वस्त आणि जेनेरिक औषधांवर अवलंबून आहेत. जॉर्डन आणि लिबिया या देशांतही निर्यात वाढली आहे. सध्या युद्धामुळे आयात आणि निर्यात दोन्हींसाठी 4 हजार ते 8 हजार डॉलरपर्यंत अतिरिक्त शुल्क मोजावे लागत आहेत. त्यामुळे कंपन्यांवर मोठा दबाव वाढला आहे. पश्चिम आशिया संकटामुळे मार्चमध्ये निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.


























































