वेब न्यूज – बायकॉट ChatGPT

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

सध्या बायकॉट ChatGPT मोठ्या प्रमाणावर ट्रेंड करत असून ChatGPT ची निर्माता कंपनी OpenAI ला त्याचा मोठा फटका बसला आहे. अमेरिकन सुरक्षा यंत्रणा पेंटागॉन आणि OpenAI यांच्यात नुकताच एक करार झाला असून आता पेंटागॉन त्यांचा अधिकृत सरकारी इंटरनेटवर ChatGPT चा वापर करणार आहे. मात्र अनेक वापरकर्त्यांना हा करार आवडला नसून त्यांनी त्याचा निषेध केला आहे. सुमारे 15 लाख लोकांनी तडकाफडकी ChatGPT चा वापर सोडला असून आपला मोर्चा Anthropic च्या Claude बॉटच्या वापराकडे वळवला आहे.

OpenAI ने हा करार केल्यानंतर 48 तासांच्या आत 15 लाख लोकांनी त्याचा वापर बंद केला. ChatGPT च्या मदतीने सरकार आपल्यावर लक्ष ठेवेल, आपली हेरगिरी करेल अशी लोकांना भीती वाटते आहे. त्यामुळे या कराराविषयी मोठा संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे पेंटागॉन Anthropic या दुसऱ्या AI कंपनीलादेखील अशा करारासंदर्भात विचारणा केली होती. मात्र Anthropic ने ही मागणी धुडकावून लावली. Anthropic च्या या कृतीमुळे अनेकांनी कंपनीचे काwतुक केले असून Anthropic च्या वापरकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

लोकांच्या या रागाचा थेट कंपनीवर होत असलेला परिणाम पाहून आता OpenAI चा सीईओ सॅम ऑल्टमॅन याने पेंटागॉनसोबत केलेल्या करारातील काही नियम व अटींमध्ये बदल केला आहे. तसेच सरकारने आपल्याला एखादे बेकायदा अथवा असंवैधानिक काम करण्यास सांगितल्यास ते करण्यापेक्षा आपण तुरुंगात जाणे पसंत करू असे आश्वासनदेखील लोकांना दिले आहे. सॅमच्या या घोषणेला आता फार उशीर झाला आहे असे मत अनेक लोक व्यक्त करत आहेत. कंपनीचे नुकसान तर झालेच, पण त्याचबरोबर त्याची कंपनी सैन्याच्या काही ऑपरेशन्सना मदत करते असा आरोपदेखील त्याच्यावर होण्यास सुरुवात झाली आहे. या सगळ्या प्रकरणात पहिल्यापासून आपल्या नकारावर ठाम असलेल्या Anthropic कंपनीला मात्र मोठा फायदा झाला आहे.