
>>तृप्ती कुलकर्णी
कविता म्हणजे कवीचा आत्मस्वर. तो उमलण्यासाठी वेदनांची बीजं अंतर्मनात रुजावी लागतात आणि त्यांना शब्दांची पालवी फुटली की, कविता जन्म घेते. कोल्हापूरचे कवी सचिन शिंदे यांनी आपल्या अशाच जीवनवेदनांना ‘पातीवरल्या बाया’ या पहिल्या काव्यसंग्रहातून शब्दबद्ध केलं आहे. या संग्रहाच्या शीर्षकातूनच त्याचा आशय सूचित होतो. स्वत शेतात, रानात राबण्याच्या कष्टप्रद जगण्यातून वाटय़ाला आलेले क्षण शब्दांकित करून जगण्याला नवा अर्थ देण्याचं काम ही कविता करते. म्हणूनच कवी आपल्या कवितेला ‘पातीवरल्या बाई‘ची उपमा देतो. गरिबीचे चटके सहन करत व्यवस्थेला तोंड देण्याचं, अनेक तडजोडी करत स्वत्व आणि सत्त्व टिकवण्याचं बळ देणारी ही कविता हिरव्यागार ताज्या टवटवीत पातीसारखीच त्यांना आधार देत आली आहे. आश्वासक वाटत आली आहे. पुनः पुन्हा उगवून येण्याची जिद्द बाळगलेली. तावून सुलाखून निघालेली ही कोवळी पाती म्हणजेच या कविता!
या कवितांमध्ये जीवनाचा व्यापक पटही उलगडतो. माणसाचं जीवन म्हणजे जणू एक नदी… अव्याहत वाहणारी, वळणं घेत अडथळ्यांतून मार्ग कात्यामुळे निसर्गातील नदी आणि जीवनरूपी नदी यांची सांगड कवी सहजगत्या घालतो. नदीच्या एका तीरावर तंत्रज्ञान आणि प्रगतीची झगमग कवीला खुणावते तर दुसऱ्या तीरावर साचलेपणाने थांबलेली, उपेक्षित गावांच्या पायवाटाही बोलावतात. ही गावं जणू नदीतील बेटांसारखी निसर्गावर प्रेम करणारी आणि त्याच्यासह प्रगतीसाठी प्रतीक्षा करणारी. त्यांच्या अपेक्षा आणि उपेक्षा दोन्हीही कवी ताकदीने मांडतो.
‘भूल गावाच्या वाटांची’ या कवितेत तो म्हणतो –
भूल गावाच्या वाटांची, नव्या पिपडते
शहराच्या वळचणी, गाव पिय़ांना धाडते
उरली ना रहदारी, पायवाटा नामशेष
मातीमाखल्या पायांचे, उरले ना अवशेष…
गावाची ओआणि शहराचं आकर्षण यांत अडकलेल्या पिची ही कातर अवस्था आहे. या संग्रहाचे वैशिष्टय़ म्हणजे यातल्या कविता विषयानुसार पाच भागांत विभागल्या आहेत. नदी आणि पुराच्या कविता, गुरांच्या आणि दुष्काळाच्या कविता, बाईच्या कविता, गावशिवाराच्या कविता आणि अवांतर कविता. एकूण 69 कवितांचा हा संग्रह सामान्य माणसाच्या सुखदुःखाचे अनेक स्तर उलगडून दाखवत आहे.
शेंदूर फासलेल्या मसाईचा गोटा
गाळ पांघरून पहुडतो निपचित
निराधार होऊन
कडुनिंबाच्या बुडाला तेव्हा
ईश्वरावरची पुरातन श्रद्धा
धूळ खात राहते
त्याच्या मनाच्या कोपऱ्यात
नदी आणि पुराच्या कवितांमध्ये वाहून जाण्याची वेदना आणि पुन्हा निष्कांचन होण्याची पोकळी प्रकर्षाने जाणवते. श्रद्धा कोसळली की, जगण्याचाही पाया हादरतो, स्वप्नांचाही गर्भपात होतो, परंतु या कविता आत्मकेंद्रित नाहीत. माणूसपणाच्या, निसर्गाच्याही आहेत. कारण कवीच्या मते माणूस उमगत जातो ते इतरांशी त्याच्या असलेल्या साहचर्यात. म्हणूनच गाव, नदी, पशू यांचं दुःखही त्याला तितकंच महत्त्वाचं वाटतं. ‘माझ्या प्रिय बैलास’ या कवितेत तो बैलाशी संवाद साधतो. कधी कृतज्ञता व्यक्त करतो, तर कधी पैशांसाठी जनावर विकावं लागल्यानं रिकाम्या गोठय़ात झुरणाऱ्या दावणीचं दुःख शब्दांत मांडतो.
अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठीच्या संघर्षात त्याला नदीचे दोन्ही काठ दिसतात… दोन्ही खुणावतात, पण त्या दोन काठांमध्ये मुक्तपणे ये-जा करण्यासाठी ना होडी आहे, ना नावाडी. या जाणिवेतून व्यवस्थेतील विरोधाभास उलगडतात आणि कविता झऱ्यासारखी वाहू लागते. कोल्हापूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सचिन शिंदे यांची गावाशी, नदीशी आणि स्त्राr मनाशी जुळलेली नाळ या कवितांतून स्पष्ट जाणवते. त्यामुळे निसर्ग आणि वैयक्तिक भावविश्वाबरोबरच सामाजिक भानही या कवितांत ठळक आहे. ‘जमाव’ या कवितेतून समाजाच्या विवेकहीनतेवर थेट प्रहार केला आहे.
दातओठ खात
जीव जाईस्तोवर
कुत्र्याला ठेचणारा
जमावही कधी पिसाळला
कळलेच नाही
एकूणच मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील परस्परावलंबित्व अधोरेखित करणाऱ्या या कविता बांधावरच्या हिरव्यागार पात्यासारख्या वाचकाला सतत खुणावत राहतात. जिद्द, वेदना आणि आशेची जाणीव करून देतात.
या संग्रहाचं मुखपृष्ठ व आतील चित्रं जितेंद्र साळुंखे यांनी साकारली असून ती आशयाशी सुसंगत आहेत. जीवनरूपी नदीचं यथार्थ दर्शन घडवणाऱ्या या कविता आवर्जून वाचाव्यात.
पातीवरल्या बाया
ढ ः सचिन शिंदे
प्रकाशक ः अष्टगंध प्रकाशन
मूल्य ः रु. 200/-
























































