
तळमजल्यावरील पिझ्झाच्या दुकानामुळे पहिल्या मजल्यावर राहणाऱया ज्येष्ठ नागरिकाला हृदयरोगाची बाधा झाली आहे. याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत.
हे ज्येष्ठ नागरिक चेंबूर येथे राहणारे आहेत. तळमजल्यावर पिझ्झाचे दुकान आहे. तेथे पिझ्झा व अन्य खाद्यपदार्थ बनवले जातात. यामुळे होणारा आवाज, धुराने रात्रीची झोप लागत नाही. श्वास घेण्यास त्रास होतो. ताण वाढला आहे. याने हृदयरोगाची व्याधी झाली आहे. तेव्हा या दुकानाला दिला गेलेला परवाना रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला द्यावेत, अशी मागणी या ज्येष्ठ नागरिकाने याचिकेद्वारे केली होती.
न्या. मकरंद कर्णिक व न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या ज्येष्ठ नागरिकाने आपले म्हणणे सहाय्यक पालिका आयुक्तांकडे सादर करावे. त्याची काळजीपूर्वक शहानिशा करून सहाय्यक आयुक्तांनी योग्य ती कारवाई करावी. ही कारवाई करण्याआधी पिझ्झा दुकानदाराचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले.
वारंवार तक्रार करूनही कारवाई नाही
हे ज्येष्ठ नागरिक 2024 पासून पालिकेकडे या दुकानाची तक्रार करत आहेत. सहाय्यक आयुक्तांच्या आदेशानुसार या ठिकाणी पालिकेने तपासणी केली. मात्र पुढे काहीच कारवाई केली नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला.



























































