
बारा ज्योतिर्लिंगांपैकी राज्यात असलेल्या पाच ज्योतिर्लिंगांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नियमित आढावा, समन्वय व नियंत्रण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पंढरपूर मंदिर विकास आराखडय़ाच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून पुढील विकासकामांचे नियोजन प्रगतीत आहे. महानुभाव पंथीयांच्या विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करण्याची कामे प्रगतिपथावर असून त्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल.
सिंधुरत्न समृद्ध योजनेस मुदतवाढ
सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिह्यांच्या सर्वंकष विकासासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना’ सन 2024-25 पर्यंत तीन वर्षांसाठी राबविण्यात आली होती. पुढील तीन वर्षांकरिता ‘सिंधुरत्न समृद्ध योजना’ 2.0 प्रस्तावित करण्यात येत आहे. कोकण विभागातील साकव बांधणी व दुरुस्तीसाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येईल.



























































