
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आज एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. लखनौहून कौशांबीच्या दिशेने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. परिस्थिती इतकी गंभीर होती की, हेलिकॉप्टरच्या डिस्प्ले पॅनेलने काम करणे बंद केले आणि संपूर्ण केबिनमध्ये धुराचे लोट पसरले. यामुळे वैमानिकाने तातडीने निर्णय घेत हेलिकॉप्टर पुन्हा लखनऊ विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले.
केशव प्रसाद मौर्य आज, 7 मार्च रोजी कौशांबी येथील ‘सारस महोत्सवाच्या’ उद्घाटनासाठी निघाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड जाणवू लागला. केबिनमध्ये धूर भरल्याने एकच खळबळ उडाली. वैमानिकाने प्रसंगावधान राखत तातडीने एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि आपत्कालीन लँडिंग केले. सुदैवाने, मौर्य यांच्यासह विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही इजा झालेली नाही. या घटनेतून केशव मौर्य थोडक्यात बचावले. पण या घटनेने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची पुन्हा आठवण झाली. राजकीय नेत्यांच्या प्रवासादरम्यान वारंवार घडणाऱ्या अशा तांत्रिक बिघाडांमुळे आता व्हीव्हीआयपी सुरक्षेचा आणि विमानांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या घटनेनंतर प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने तपास सुरू केला आहे. तांत्रिक पथक हेलिकॉप्टरमधील बिघाडाचे नेमके कारण शोधत आहे. दरम्यान, केशव प्रसाद मौर्य यांनी आपला कौशांबीचा दौरा रद्द न करता, रस्तेमार्गे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते सायरा येथील बाबू सिंह पदवी महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित महिला सक्षमीकरणावर आधारित ‘सारस महोत्सवाचे’ उद्घाटन करणार आहेत.

























































