
>> अभय मिरजकर
अहमदपूरमधील वेदांत याने धावण्याच्या छंदाला सुरुवात करीत ‘सिंहगड-राजगड-तोरणा’ ही पहिली ऐतिहासिक धाव पूर्ण केली आणि आता आव्हानात्मक अशा ‘दिल्ली मॅरेथॉन’मध्ये चुणूक दाखवली आहे. त्यांनी 42 किलोमीटरचे अंतर अवघ्या 3 तास 31 मिनिटांत पूर्ण करीत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
जिद्द, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर माणूस शून्यातून विश्व निर्माण करू शकतो, याचा प्रत्यय अहमदपूरच्या वेदांत राठोड यांनी पुन्हा एकदा दिला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे आयोजित अत्यंत प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक ‘दिल्ली मॅरेथॉन’मध्ये अहमदपूरचे सुपुत्र वेदांत हनमंतराव राठोड यांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत 42 किलोमीटरचे कठीण अंतर अवघ्या 3 तास 31 मिनिटांत पूर्ण केले. या विक्रमी कामगिरीमुळे त्यांनी केवळ अहमदपूरचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव देशाच्या क्रीडा नकाशावर सुवर्ण अक्षरांनी कोरले असून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
वेदांत राठोड यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. व्यवसायाने जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्था, अहमदपूर येथे ज्युनिअर क्लर्क म्हणून कार्यरत असलेले 35 वर्षीय वेदांत यांनी आपल्या धावण्याच्या छंदाला 2021 मध्ये खऱया अर्थाने सुरुवात केली. सरकारी निमशासकीय कार्यालयातील कामाचा व्याप आणि जबाबदारी सांभाळत असतानाच त्यांनी आपल्या सरावात कधीही खंड पडू दिला नाही. त्यांची पहिली ऐतिहासिक धाव ही ‘सिंहगड-राजगड-तोरणा’ या गडकिल्ल्यांवरील सुमारे 25 किलोमीटर अंतराच्या अवघड ट्रेक-रनने झाली आणि तिथूनच त्यांच्या मॅरेथॉन प्रवासाला खऱया अर्थाने वेग मिळाला. नोकरीच्या वेळा सांभाळून पहाटेचा सराव आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यामुळेच ते आज या टप्प्यापर्यंत पोहोचू शकले आहेत.
त्यांच्या विक्रमी कामगिरीचा आलेख पाहिला तर तो थक्क करणारा आहे. दिल्ली मॅरेथॉन ही भारतातील पहिल्या तीन नावाजलेल्या मॅरेथॉनपैकी एक मानली जाते, जिथे दरवर्षी सुमारे 30 ते 40 हजार धावपटू सहभागी होतात. अशा अटीतटीच्या स्पर्धेत वेदांत यांनी 3 तास 31 मिनिटांची आपली वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी त्यांनी सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये सलग दोन वेळा सुवर्ण पदक आणि एकदा रौप्य पदक पटकावण्याचा बहुमान मिळवला आहे. सातत्याच्या जोरावर त्यांनी आतापर्यंत 21 किलोमीटरच्या 20 हून अधिक हाफ मॅरेथॉन आणि 42 किलोमीटरच्या 4 पूर्ण मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे, 1 जुलै 2025 ते 30 जुलै 2025 या कालावधीत सलग 30 दिवस दररोज 11 किलोमीटर धावण्याचा एक आगळावेगळा विक्रमही त्यांनी आपल्या नावे केला आहे.
या यशाबद्दल बोलताना वेदांत राठोड यांनी कृतज्ञता व्यक्त केली की, गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा हा प्रवास अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक होता, मात्र जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर हे स्वप्न साकार झाले आहे. या यशात अहमदपूर रनर्स ग्रुपचा मोलाचा वाटा असून ग्रुपचे अध्यक्ष, उपाध्यक्ष पवन पुरोहित, बरुरे, सूर्या साकोळे, भरत इगे, धनंजय तोकले, संतोष भुरे, मार्गदर्शक दीपक वलसे सर तसेच रनिंग कोच सुरेश राठोड यांच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाले आहे.
एका छोटय़ा शहरातील क्लर्क पदावर काम करणारा तरुण जेव्हा देशाच्या राजधानीत जाऊन आपली छाप पाडतो, तेव्हा ती केवळ वैयक्तिक कामगिरी उरत नाही, तर ती संपूर्ण शहरासाठी आणि ग्रामीण भागातील युवकांसाठी एक मोठी प्रेरणा ठरते. यापुढेही आपली वेळ अधिक सुधारून जागतिक स्तरावर चमकण्याचा निर्धार वेदांत यांनी व्यक्त केला असून, त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


























































