
>> डॉ. मीनाक्षी पाटील
कलाकृतीला तिच्या अस्तित्वाचे प्राणतत्त्व असलेली ‘सौंदर्यवस्तू’ स्वतंत्रपणे अस्तित्वात आणता येत नाही, तर त्यासाठी तिला रसिकाच्या सर्जक सहभागाची आवश्यकता असते आणि कलाकृतीतून अभिव्यक्त झालेला अनुभव रसिकाला आस्वादाच्या पातळीवर पुन्हा अनुभवावा लागतो. या अर्थाने कलावस्तू व सौंदर्यवस्तू या एकाच वेळी परस्परभिन्न, परंतु परस्परावलंबी ठरतात.
कलाकृतीच्या माध्यमातून येणाऱया साधारणीकरणाच्या अनुभवातच कलानिर्मिती आणि कलास्वाद यांचे मर्म कसे दडलेले असते, हे आपण मागील लेखात पाहिले. मानवी स्वभावातील जीवनाचा आस्वाद घेण्याच्या मूळ प्रेरणेतूनच सौंदर्यनिर्मिती आणि सौंदर्यास्वाद आकाराला येत असतात.या प्रक्रियेत कलाकृती व रसिकातील संवादातून सिद्ध होणाऱया कलानुभवाला विशेष महत्त्व असते. या अर्थाने पाहिल्यास कलाकृतीचा अनुभव, आस्वाद हाही एक जीवनानुभवच असतो.अर्थात या कलास्वादाची गुणवत्ता ही कलाकृतीसोबतच रसिकाच्या संवेदनशीलतेवरही अवलंबून असते. कलावंत, कलाकृती, कलारसिक, कलास्वाद याविषयी भारतीय साहित्य शास्त्रात तसेच पाश्चिमात्य साहित्य शास्त्रात विपुल लेखन झालेले आहे. सौंदर्यशास्त्र या ज्ञानशाखेत तर कला, कलावंत, कलारसिक, कलावस्तू, सौंदर्यवस्तू व त्यांच्याशी निगडित तत्त्वविचार आदी विषयांचा सविस्तर अभ्यास केला गेला आहे. घटितार्थवादी सौंदर्यशास्त्राrय विचारानुसार कोणतीही कलाकृती ही शब्द, रंगरेषा आदी विविध गुणद्रव्यांनी जरी बनलेली असली तरी केवळ त्यांच्यामुळेच तिचे अस्तित्वरूप समग्रपणे, पूर्णांशाने सिद्ध होत नाही असे मानले जाते. या अर्थाने पाहिल्यास कलाकृतीचे अस्तित्व केवळ प्राकृतिक, व्यवहारोपयोगी वस्तूच्या कोटीत मोडत नाही तर या विचारानुसार रंग, रेषा, नाद, शब्द इ. घटकांद्वारे अनुभवाला येणाऱया कलाकृतीला ‘कलावस्तू’ तर कलाकृतीद्वारे अनुभवाला येणाऱया अर्थरूपाला ‘सौंदर्यवस्तू’ असे म्हणतात.
कलाकृतीची ‘कलावस्तू’ व ‘सौंदर्यवस्तू’ ही दोन्ही अंगे परस्परावलंबी असतात. सौंदर्यशास्त्रात कलावस्तू व सौंदर्यवस्तू या संकल्पनांशी निगडित तत्त्वविचारानुसार कलावंताने विशिष्ट साधनांचा वापर करून विशिष्ट माध्यमातून जाणीवपूर्वक घडवलेली एक नवी सचेतन अशी अर्थलक्षी अनुभवाकृती म्हणजे कलाकृती होय. या अनुभव प्रक्रियेत लेखक प्रथम साहित्यकृती निर्माण करतो व तिचा आस्वाद घेण्यासाठी रसिकाला आवाहन करतो. साहित्यकृतीच्या आस्वादात रसिक सहभागी झाल्यानंतरच त्याच्या सहसर्जक सहभागातूनच ‘सौंदर्यवस्तू’ आकाराला येत असते. थोडक्यात, कलाकृतीला तिच्या अस्तित्वाचे प्राणतत्त्व असलेली ‘सौंदर्यवस्तू’ एकटय़ाने, स्वतंत्रपणे अस्तित्वात आणता येत नाही, तर त्यासाठी तिला रसिकाच्या सहसर्जक सहभागाची नितांत आवश्यकता असते. मात्र या सहसर्जक प्रक्रियेत कलाकृतीच्या वस्तुनिष्ठ संहितेच्या चौकटीतच सौंदर्यवस्तूच्या अनेक शक्यता उलगडण्याचे स्वातंत्र्य रसिकाला लाभते. हे उलगडताना आपल्या कल्पनाशक्तीच्या सहाय्याने संहितेतील शब्दांमागचे अन्वयार्थ समजून घेत रसिकाला सौंदर्यवस्तूची निर्मिती करता येत असते. अशा रीतीने कलावस्तू ही इंद्रियगोचर, प्रत्यक्ष असते तर रसिकाच्या सहसर्जक प्रतिसादाने आकाराला येणारी सौंदर्यवस्तू मात्र प्रत्यक्षातीत व संभावनायुक्त अशी असते. या अर्थाने कलावस्तू व सौंदर्यवस्तू या एकाच वेळी परस्परभिन्न, परंतु परस्परावलंबी असतात.
कलाकृतीच्या अंगी अर्थदृष्टय़ा स्वभावतच एक वैशिष्टय़पूर्ण असे अनिश्चिततेचे क्षेत्र असते, तिच्या अंगी अनेक अर्थ प्रसवण्याच्या अनेक संभाव्य शक्यता नांदत असतात. कलाकृतीतील या संभाव्य अर्थाच्या अनेक शक्यता मात्र रसिकाच्या सहसर्जक प्रतिसादाशिवाय अस्तित्वातच येऊ शकत नाहीत. या अर्थाने कलाकृती ही मूलतच एक अपूर्ण अस्तित्व असते. थोडक्यात, कलानुभव आकाराला येताना अभिव्यक्तीच्या स्तरावर जसा कलावंत सर्जनशील असतो तसाच रसिकसुद्धा आस्वादाच्या पातळीवर सर्जनशील असावा लागतो. कलाकृतीतून अभिव्यक्त झालेला अनुभव रसिकाला आस्वादाच्या पातळीवर पुन्हा अनुभवावा लागतो. येथेच साधारणीकरणाला महत्त्व प्राप्त होते.
साधारणीकरण ही कलावंताची जशी सर्जनकालीन मानसिक अवस्था असते अगदी तसाच साधारणीकरणाचा अनुभव आस्वादकाली रसिकालाही येत असतो. कलाकृतीतील भावनाशय ज्या वेळी नैसर्गिक सहजतेने सौंदर्यतत्त्वामधून आकारित होतो त्याच वेळी तो खऱया अर्थाने आस्वाद्य होतो. अशी आशय आणि अभिव्यक्तीची एकरूपता कलानुभवासाठी आवश्यक असते. भारतीय रसशास्त्रातही कला सर्जन आणि आस्वाद यावर विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. या विचारानुसार सर्जनात आकृतीतत्त्वाचा अभाव असेल तर आशयाला सौंदर्य प्राप्त होत नाही तसेच सौंदर्याशिवाय आशयाला आस्वाद्यता येत नाही. याच कारणास्तव आकृतीच्या अभावी जीवनाशयाला कलेचे स्वरूप प्राप्त होऊ शकत नाही याचे स्पष्ट भान भरताप्रमाणेच आनंदवर्धनालाही होते. त्याच्या ‘ध्वनिसिद्धांता’त याचे स्पष्ट दर्शन घडते.
कोणत्याही कलानुभवात भावनाशयाच्या अभिव्यक्तीसाठी माध्यमाची आवश्यकता असते. आपण मागील लेखात पाहिले की, विविध कलांमध्ये शब्द, रंग, स्वर यासोबतच कलावंताचे व्यक्तित्व हेही कलानिर्मितीत माध्यम म्हणून कार्यरत असते. माध्यमभिन्नतेमुळेच विविध कलांमध्ये भिन्नता येते व त्याआधारेच कलाकृती प्रत्यक्षात अनुभवालाही येते. जगत असताना येणाऱया असंख्य अनुभवांविषयी कलावंताच्या मनात जी घुसळण चाललेली असते ती व्यक्त करण्यासाठी तो प्रतिमांचे विश्व निर्माण करतो. हे प्रातिभासिक विश्व निर्माण करण्यासाठी कलावंत वेगवेगळ्या माध्यमांची मदत घेत असतो.
प्रत्येक माध्यमाच्या वैशिष्टय़पूर्ण स्वरूपामुळे वेगवेगळ्या कलांमधील प्रतिमारूपेही आगळीवेगळी असतात. काळाच्या ओघात माध्यमांच्या स्वरूपात खूप वेगवेगळ्या प्रकारे बदल होत आले आहेत. कलावंत मंडळी आपापल्या निवडलेल्या माध्यमांमध्ये सतत वेगवेगळे प्रयोग करीत, अभिव्यक्तीच्या नवनवीन शक्यता शोधत माध्यमांचे क्षितिज विस्तारत असतात. यापुलेखांमधून आपण वेगवेगळ्या माध्यमांतून व्यक्त होणाऱया साहित्य ( कविता, कथा, कादंबरी),नृत्य, नाटय़, संगीत, शिल्प, चित्रपट, चित्रकला, वास्तुकला, छायाचित्रणकला अशा विविध कलांमधील दृश्य-अदृश्याचा वेध घेणार आहोत.
(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव, कवयित्री, चित्रकार आहेत.)
[email protected]
























































