
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी हिंदुस्थानात घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या. दुसरी पेट्रोल-डिझेलच्या किंमती सध्या स्थिर असल्या तरी भविष्यामध्ये त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण इराणच्या हल्ल्यानंतर कुवैतने कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
आखातामध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कुवैतने खबरदारीचा उपाय म्हणून कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कुवैतची सरकारी तेल कंपनी ‘कुवैत पेट्रोलियम कॉर्पोरेशन’ने सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. याआधी इराणने हार्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना इशारा दिला होता. याच खाडीतून जगभरातील 50 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक होते. या खाडीतून कच्च्या तेलाची वाहतूक संथगतीने सुरू असल्याने आणि कुवैतनेही तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने जागतिक तेल बाजार आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर होणाऱ्या संभाव्य परिणामांची चर्चा आता रंगू लागली आहे.
कुवैत हा ‘ओपेक’ मधील पाचवा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. आता कुवैतनेच कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. कुवैतच्या निर्णयामुळे इतर देशांना कच्चे तेल मिळवण्यात अडचणी येऊ शकतात आणि यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या क्रूड ऑईलची किंमत प्रति बॅरल 92 डॉलरच्या पार गेली असून युद्ध सुरू झाल्यापासून यात जवळपास 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय
कुवैत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने स्पष्ट केले की, कच्च्या तेलाचे उत्पादन आणि रिफायनिंगमधील ही कपात पूर्णपणे सावधगिरीचा उपाय आहे. कंपनीच्या मते, हा निर्णय त्यांच्या जोखीम व्यवस्थापन धोरणाचा आणि व्यवसाय सातत्य राखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. परिस्थिती सामान्य होताच उत्पादन पुन्हा जुन्या स्तरावर नेण्यासाठी कंपनी पूर्णपणे सज्ज आहे.
हिंदुस्थानची स्थिती काय
हिंदुस्थानातील पेट्रोल आणि डिझेलचा साठा देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा असल्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली असली, तरी हिंदुस्थानचा इंधन साठा समाधानकारक स्थितीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हिंदुस्थानकडे धोरणात्मक साठ्यासह सुमारे आठ आठवड्यांचा कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांचा साठा उपलब्ध आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आगीचे लोळ उठले, धुरामुळे आकाशही दिसेनासे झाले; तेहरानमधील तेल डेपोंवर इस्रायल-अमेरिकेचा मिसाईल हल्ला




















































