
प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (RCom) या कंपनीच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाची १०८५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) नवीन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अनिल अंबानी यांच्यासह कंपनीच्या तत्कालीन संचालिका मंजरी अशोक कक्कर आणि इतर काही व्यक्तींवरही एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
पंजाब नॅशनल बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार, २०१३ ते २०१७ या कालावधीत अनिल अंबानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्ज निधीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केल्याचा आरोप आहे. ज्या कारणासाठी कर्ज मंजूर करण्यात आले होते, त्या कामासाठी निधी न वापरता तो इतरत्र वळवण्यात आला. या आर्थिक अफरातफरीमुळे पंजाब नॅशनल बँकेचे ६२१.३९ कोटी रुपये आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे ४६३.८० कोटी रुपये, असा एकूण १०८५.१९ कोटी रुपयांचा तोटा या बँकांना सहन करावा लागला आहे.
सीबीआयने केलेल्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, आरोपींनी संगनमत करून बनावट व्यवहार दाखवला आणि कंपनीच्या हिशोबात जाणीवपूर्वक फेरफार केल्याचा आरोप आहे. आपल्याशीच संबंधित असलेल्या इतर कंपन्यांना निधी देऊन बँकांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. २०१७ मध्ये ही कर्ज खाती एनपीए (NPA) म्हणून घोषित करण्यात आली होती, मात्र त्यानंतर झालेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये या व्यवहारांमधील फसवणूक उघड झाली.
दरम्यान, अनिल अंबानी यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेले हे तिसरे मोठे प्रकरण आहे. यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा यांच्या तक्रारीवरूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.




























































