विज्ञान रंजन – घट्ट पाण्याचा ‘तिप्पट’ महासागर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

लेखाचं शीर्षक वाचून थोडं कोड्यात पडाल. कारण सागर असेल तर ‘घट्ट’ स्वरूपाचा कसा आणि ‘तिप्पट’ म्हणजे काय? अशी अनेक कोडी पृथ्वीमध्ये दडलेली आहेत. आपल्या निळ्या ग्रहाच्या भू-जलपृष्ठावर आपल्यासह असंख्य सजीवांची वस्ती आहे. मात्र समुद्रात विहरणाऱ्या जलचरांचं एक निराळंच जग आहे. महासागरात खूप म्हणजे पॅसिफिक महासागराच्या ‘मरिना ट्रेन्स’च्या एका भागात खोल समुद्री जागा आहे. सुमारे 11 किलोमीटर खोलवर! त्याला ‘चॅलेन्स डीप’ असं म्हणतात. त्यामध्ये जगातलं सर्वोच्च म्हणजे सुमारे 9 किलोमीटर उंचीचं (अर्थात समुद्रसपाटीपासून) ‘एव्हरेस्ट शिखर’ बुडवलं तरी त्याच्या माथ्यावर 2 किलोमीटरपर्यंत ‘चॅलेन्स डीप’मधलं सागरजल उसळत राहील. त्यामुळे पॅसिफिक महासागरातली ही जागा जलसाठय़ाची सर्वात खोलवरची जागा म्हणता येईल. ज्या प्रकारचं ‘एचटूओ’ म्हणजे हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक अणु यांच्या संयुगातून निर्माण होणारं ‘पाणी’ आपण पाहतो, अनुभवतो ते लक्षात घेता ‘चॅलेन्ज डीप’चं महत्त्व निश्चितच आहे.

पृथ्वीवरच्या सागरांमध्ये 71 टक्के पाणी आहे ते खारट. ‘गोडं’ पाणी अवघं दीड-दोन टक्के असून ते ध्रुवीय बर्फ, नद्या, तलाव, सरोवर वगैरेत भरलेलं आहे. ते वगळता भूपृष्ठाचा उरलेला भाग आपण राहतो तो भूकवचाचा दगड-धोंडे, माती-पर्वतांचा. मग सर्व महासागरांच्या ‘तिप्पट’ भरेल एवढं पाणी आहे कुठे?

ते आहे, भूकवचापासून 525 ते 660 किलोमीटर खोल ‘रिंगवुडराइट’ नावाच्या भागात. ते सगळं मिळून पृथ्वीवरच्या सर्व समुद्रांच्या जलसाठय़ाच्या ‘टिप्पट’ आहे! सर्व समुद्र-महासागर वगैरे एकत्र केले तर तो जलनिधी 1.335 अब्ज घनकिलोमीटर एवढा होईल. एक क्युबिक किलोमीटर (घन किलोमीटर) पाणी लिटरमध्ये मोजलं तर एक ट्रिलियन लिटर (एकावर 12 शून्य) एवढं होतं. असे एक अब्जापेक्षा अधिक घनकिलोमीटर पाणी पृथ्वीवर आपल्याला दिसतं. त्याच्या तिप्पट म्हणजे सुमारे 3 अब्ज घनकिलोमीटरपेक्षा अधिक ‘अदृश्य’ पाणी दडलं आहे ते पृथ्वीच्या कवचाखालच्या ‘रिंगवुडराइट’ भागात!

पृथ्वीमधलं हे ‘रिंगवुडराइट’ सोप्या शब्दात सांगायचं तर काहीसा ‘स्पंज’सारखा द्रव शोषणारा भाग असून या सुमारे अडीचशे किलोमीटर जाडीच्या भूगर्भीय रचनेत प्रचंड पाणी साठलेलं आहे. हा सर्व भाग उच्च दाबाच्या मॅग्नेशिअम सिलिकेटचा बनलेला असून त्यामध्ये हायड्रॉक्साइड आयन (विद्युतभारित कण) आहेत. ते 1 मॅग्नॅशिअम आणि 2 ऑक्साइड आयनपासून बनतात. याच्या अधिक तांत्रिक चर्चेत न जाता आपण या विशाल, परंतु अज्ञात जलस्रोताची विस्मयकारी माहिती तेवढी घेत आहोत. कारण विज्ञान ‘रंजक’पणे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यातून एखाद्याला भूगर्भशास्त्रचा (जिओलॉजीचा) अभ्यास करण्याची ऊर्मी आली तर उत्तमच.

हे ‘रिंगवुडराइट’सारखं खनिज पहिल्यांदा आढळलं ते ‘तेन्हाम’ (1879) नावाच्या एका अशनीच्या तुकडय़ाचा अभ्यास करताना. ही गोष्ट 1969 मधली. तेच पृथ्वीच्या अंतर्भागात मोठय़ा प्रमाणावर दडल्याचं नंतर आढळलं. पृथ्वीच्या ‘मॅन्टल’मधील (कवचाखाली) ऑलिविन आणि पायरोक्झिनवर सुमारे 600 किलोमीटर भूकवचाखाली येणाऱया दाबाचा (प्रेशरचा) काय परिणाम होतो याचा अभ्यास ऑस्ट्रेलियन भूगर्भतज्ञ टेड रिंगवूड करत होते. त्यावेळी त्यांना या जलशोषक भूमीगत थराचा शोध लागला. त्यामुळे त्याला त्यांचं नाव मिळालं. ते पृथ्वीवर येणाऱया अनेक अंतराळी ‘अशनी’मध्येही दिसून येतं. त्यांची जलशोषक शक्ती मोठी असते.

मात्र या ‘रिंगवुडराइट’ भागात पाणी येतं कुठून? असा प्रश्न ‘गुगल’ला केलात तर समजेल की, पृथ्वीवरच्या दृश्य जलसाठय़ामधलंच पाणी लाखो वर्षे ‘प्लेट टॅक्टॉनिक’मधल्या भेगांमधून झिरपून प्रचंड दाबाखाली ‘हायड्रॉक्साइ रॅडिकल’मध्ये परावर्तित होऊन भूगर्भात साचलं आहे. आता पृथ्वीचं साडेचार अब्ज वर्षांचं वय लक्षात घेतलं तर आतापर्यंत झिरपून ‘क्रिस्टल’ स्वरूपात साठलेल्या पाण्याचं प्रमाण प्रचंड असणारच. गमतीचा भाग म्हणजे पृथ्वीच्या याच भागात तयार झालेल्या एका हिऱयाचं पृथक्करण 2014 मध्ये केलं तेव्हा त्यातही 1.4 टक्के जलांश आढळले.

समजा, पृथ्वीच्या अंतर्भागात काही उलथापालथ घडून हे घट्ट स्वरूपात दडलेलं सगळं पाणी द्रवरूपात (एच2ओ) भूपृष्ठावर आलं तर… तर मात्र जलचरांची वस्ती वगळता बाकीचे सजीव, झाडापानांसह सर्वच त्यात बुडून जातील. हा प्रलय एवढा मोठा आणि व्यापक असेल की हिमालय, आल्पस ऑन्डिज वगैरे पर्वतांची उंचच उंच शिखरं पृथ्वीवरच्या पाण्यातून थोडीफार वर डोकावतील. त्यावर कोणी ‘सजीव’ टिकले तर ते पृथ्वीवरचे भाग्यशाली ठरतील. पायाखालची जमीन सरकणे नव्हे, तर बुडणे म्हणजे काय त्याचा अनुभव प्रगत माणसालासुद्धा येईल. शिवाय ते पाणी उकळतं, उष्ण असेल!

अर्थात हा केवळ गणिती कल्पनाविलास. असं काहीच घडणार नाही. मात्र भूकवचाखालचं पाणी कधीतरी वर येऊन समुद्राला कायमचं उधाण आणून पृथ्वी बुडण्याआधीच आपल्या जीवसृष्टीला वेगळ्या अर्थाने ‘बुडवायला’ माणूस किती ‘सक्षम’ आहे हे पर्यावरण ऱ्हासाबरोबरच सध्या ठिकठिकाणी उसळलेल्या युद्धज्वराच्या आगडोंबातून दिसतंच आहे.