
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. त्यातच आता त्यांचा मुलगा निशांत कुमार यांनी आज संयुक्त जनता दलाचे सदस्यत्व घेतले. या कार्यक्रमात नितीश कुमार उपस्थित नव्हते.
नितीश कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यसभेवर जाण्याचा निर्णय जाहीर करताना त्यांनी बिहारमधील नव्या सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासनही दिले. त्यामुळे, बिहारमधील नितीश कुमार युगाचा अंत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मात्र, आता त्यांचा मुलगा निशांत कुमार यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.
वडिलांनी केलेली कामं पुढे नेणार – निशांत कुमार
निशांत यावेळी म्हणाले, राज्यसभेवर जाण्याचा निर्णय माझ्या वडिलांचा आहे. त्यांच्यावर बिहारच्या जनतेने विश्वास ठेवावा. मी पक्षासाठी परिश्रम घेईन. वडिलांनी 20 वर्षांमध्ये जी कामं केली, ती पुढे नेणार. निशांत कुमार यांनी जदयुचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर वडील नितीश कुमार यांची भेट घेतली.
























































