
लहरी हवामानामुळे कोकणात आंबा व काजू उत्पादनात 85 ते 90 टक्के घट होण्याची भीती आहे. त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी या शेतकऱयांना हेक्टरी पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभेत केली. त्यावर विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी यावर ठोस निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले.
राज्य सरकारने मंत्रालयात बैठक घेऊन आंबा व काजू फळांबाबत क्षेत्रीय पाहणी अहवाल सादर करण्यास सांगितला होता. त्यानुसार 3 ते 21 फेब्रुवारी या काळात कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने (दापोली) संयुक्त पाहणी केली. त्यानुसार चालू हंगामात आंबा व काजू उत्पादनात सरासरीच्या तुलनेत 85 ते 90 टक्क्यांपेक्षा अधिक घट होण्याची शक्यता आहे. आंबा व काजू हे कोकणातील प्रमुख नगदी पीक असून हजारो कुटुंबीयांचे उपजीविकेचे मुख्य साधन आहे. त्यामुळे शेतकऱयांना मोठय़ा आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे याकडे आमदार दीपक केसरकर व शेखर निकम यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले.
काजू उत्पादक शेतकऱयांना 15 रुपये अनुदान
चर्चेत भाग घेताना शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव म्हणाले की, गेल्या वर्षी काजू उत्पादक शेतकऱयांना बीमागे दहा रुपये अनुदानाचा फायदा झाला नाही. यंदा काजू उत्पादक शेतकऱयांना बीमागे पंधरा रुपये अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रकाश सुर्वे यांनीही भाग घेतला. त्यावर या मागणीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सदस्यांना दिले.
शिवसेनेने उठवला आवाज
शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आंबा उत्पादक शेतकऱयांच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले. दोनदा आलेला मोहोर जळून गेला. 90 टक्के आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. आंबा उत्पादक शेतकरी बेजार झाला आहे. त्यामुळे या शेतकऱयांना सरसकट हेक्टरी पाच लाख रुपये नुकसानभरपाई तातडीने देण्याची मागणी सुनील प्रभू यांनी केली.


























































