केंद्राने बंगाल सरकारकडून मागितले उत्तर, राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा ठपका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावरून मोदी सरकार आणि मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांच्यात नव्याने संघर्ष निर्माण झाला आहे. कार्यक्रमाचे स्थळ बदलल्याबाबत राष्ट्रपती मुर्मू यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांना प्रत्युत्तर देत भाजपवर कडाडून टीका केली होती. आता राष्ट्रपतींच्या दौऱयावर प्रोटोकॉलचे पालन न केल्याबाबत बंगालच्या मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला आहे.

केंद्रीय गृह सचिवांनी चार प्रमुख मुद्दय़ांवर उत्तर मागितले आहे. राष्ट्रपतींचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक का उपस्थित नव्हते, राष्ट्रपतींसाठी तयार करण्यात आलेल्या वॉशरूममध्ये पाणी नव्हते, प्रशासनाने राष्ट्रपतींसाठी निश्चित केलेल्या मार्गावर सर्वत्र कचरा होता, असे केंद्रीय गृह सचिवांनी म्हटले आहे. याबाबत दार्जिलिंगचे जिल्हाधिकारी, सिलीगुडीचे पोलीस आयुक्त आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यासाठी जबाबदार असल्याचा ठपका केंद्रीय गृह मंत्रालयाने ठेवला आहे.

वाद कशामुळे ?

राष्ट्रपती मुर्मू यांना आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. हा कार्यक्रम सिलीगुडी येथील बिधाननगर येथे होणार होता, मात्र कार्यक्रम स्थळ बदलण्यात आले. हे स्थळ अतिशय लहान होते, असे राष्ट्रपतींनी म्हणत नाराजी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री, मुख्य सचिव किंवा इतर कोणत्याही मंत्री त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित नव्हते. त्यामुळे ममता बॅनर्जी माझ्यावर नाराज आहेत का, असे राष्ट्रपती म्हणाल्या होत्या. त्यास ममता यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, तुम्ही निवडणुकीच्या काळात आल्या तर मला तुमच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होणे शक्य होणार नाही. भाजप एवढय़ा खालच्या पातळीवर उतरला आहे की, राज्याला बदनाम करण्यासाठी ते राष्ट्रपतींचा वापर करत आहेत, अशी टीका ममतांनी केली होती. यावरून बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.