
जागतिक नकाशावर मानाचे पान मिरवणाऱ्या घारापुरी बेटाच्या पोटातून कोणता ‘पुरातन खजिना’ हाती लागणार आहे, याकडे घारापुरीवासीय आणि पुरातन वास्तुतज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. घारापुरी बेटावर मिळालेल्या पुरातन वस्तूंमुळे या बेटाच्या पोटात आणखी इतिहासाचा खजिना दडल्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने गेल्या चार महिन्यांपासून अखंडपणे उत्खननाचे काम सुरू केले असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत हे खोदकाम सुरू राहणार आहे.
ऐतिहासिक घारापुरी बेटावर याआधी ठिकठिकाणी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पुरातन काळातील दळणकांड करण्यासाठी वापरात येणारी दुर्मिळ मडकी, शिवलिंग तसेच विविध पुरातन वस्तूंचे भग्न अवशेष सापडले आहेत. त्यामुळे पुरातत्व खात्याने या बेटावर आणखी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला.
शेतबंदर गावात एक हजार मीटर लांबीचे उत्खनन या निर्णयानंतर घारापुरी बेटावर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी डिसेंबर 2025 पासून आणखी खोलवर सर्वेक्षण करण्यासाठी उत्खननाच्या कामाला सुरुवात केली आहे. शेतबंदर गावातील स्मशानभूमी ते सीता गुंफा हा एक हजार मीटर लांबीचा नाला व नाला परिसरात मागील चार महिन्यांपासून उत्खननाचे काम सुरू आहे. येत्या मे 2026 पर्यंत हे उत्खननाचे काम सुरू राहणार आहे. या सर्वेक्षणातून आणि खोदकामातून ऐतिहासिक घारापुरी बेटावरील इतिहासावर आणखी प्रकाश पडण्यास मदत होईल, असा विश्वास भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

























































