अजितदादांचे विमान पडले की पाडले गेले? बड्या नेत्यांकडून व्ही. के. सिंग यांना संरक्षण, रोहित पवार यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजितदादांचे विमान पडले की पाडले गेले? हा आमचा साधा प्रश्न आहे. व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचा मुलगा रोहित सिंग याच्या लग्नात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, प्रफुल्ल पटेल, राममोहन आदी सत्तेत असणारे मोठे नेते उपस्थित होते. बड्या नेत्यांकडून व्ही. के. सिंग यांना संरक्षण असल्यामुळेच अजित पवारांना न्याय मिळू शकत नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केला.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी दिल्लीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेऊन अजितदादांच्या विमान अपघाताचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याची मागणी केली. या प्रकरणात व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांना जाणीवपूर्वक वाचवले जात असल्याचा आरोप करत रोहित पवार म्हणाले, मी प्रफुल्ल पटेलांना विनंती केलीय की, तुम्ही जर अजितदादांच्या जवळचे असाल, आणि तुम्ही रोहित सिंग याच्या लग्नाला होताच, तर त्या लग्नात आणखी कोण होते? त्यांची नावे समोर येऊन सांगा. लग्नात असणारे लोक पॉवरफुल आहेत. त्यामुळे 100 टक्के कुठे ना कुठे व्ही. के. सिंग, रोहित सिंग आणि व्हीएसआरला याच मोठय़ा नेत्यांकडून वाचवले जात असल्याचे सिद्ध होते, असा दावा रोहित पवारांनी केला.

सीआयडीने सिंग यांचे कॉल रेकॉर्डस् तपासावे

कॅप्टन कपूर यांनी व्ही. के. सिंग यांना फोन केला होता. व्हिजिबिलिटी खराब आहे, मी उड्डाण करू शकत नाही, असे वैमानिकाने स्पष्ट सांगितले होते. मात्र, त्यावर व्ही. के. सिंग यांनी तू टेक ऑफ कर, बाकी नंतर पाहून घेतो, असा आदेश दिला. सीआयडीने व्ही. के. सिंग यांचे कॉल रेकॉर्डस  तपासले, तर हे संभाषण समोर येईल. व्ही. के. सिंगला ताब्यात घेतले, तर तो काही लोकांची नावे घेईल. त्यामुळे काही लोकांना भीती वाटत असल्याचे रोहित पवार म्हणाले.